इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आयोजित " एआय पे चर्चा " या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना उच्च दर्जाच्या मानवविरहित माहितीचे ( डेटाचे) महत्व अधोरेखित

Posted On: 22 DEC 2022 9:12AM by PIB Mumbai

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  क्षमता वृद्धीसाठी आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा भक्कम पाया म्हणून डेटा अर्थात माहितीचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच प्रमुख विचाराला अनुसरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (एनइजीडी) ने अलीकडेच " एआय पे चर्चा " हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पॅनेलच्या सदस्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दर्जेदार डेटाचे महत्त्व आणि दृष्टिकोन यावर चर्चा केली.

एनइजीडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात  सरकारी अधिकारी, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ञ, व्यावसायिक, युवावर्ग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देण्यात डेटाचे महत्व समजून घेण्यासाठी उत्सुक असलेले विविध क्षेत्रातील वक्ते उपस्थित होते. या सर्वांसाठी हे सत्र अतिशय माहितीपूर्ण ठरले.  एआय पे चर्चाच्या या सत्राच्या पॅनेलमध्ये , फ्रॅक्टल अॅनालिटिक्सचे (ग्रुप ) मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीकांत वेलमाकन्नी, सिव्हिक डेटा लॅबचे संचालक आणि सह-संस्थापक  गौरव गोधवानी,  ARTPARK (एआय आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क ) चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी, यांचा समावेश होता.

अभिषेक सिंग यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा चे महत्व विशद दिले. तसेच दर्जेदार डेटासेट संकलनासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय डेटा प्रशासन आराखडा धोरण आणि इतर प्रमुख उपक्रमांची माहिती दिली 

पॅनेलवरील प्रख्यात सदस्यांनी सध्याची खुली डेटा परिसंस्था , कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दर्जेदार डेटासेट सहज रीत्या उपलब्ध होण्यामधील आव्हाने, नवनवीन उपक्रमांसाठी डेटाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी विविध भागधारकांची भूमिका आणि भारतासाठी पुढे जाण्याचा मार्ग याबद्दल त्यांची मते व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरत , नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “अनलॉकिंग पोटेंशियल ऑफ इंडियाज ओपन डेटा” या अहवालावरही या सत्रादरम्यान चर्चा करण्यात आली. भारताच्या खुल्या शासन डेटाची क्षमता वृद्धिंगत करण्याचे  मार्ग सुचवण्यासाठी 2021 मध्ये  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नॅसकॉम, फ्रॅक्टल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस ,आय डी एफ सी इस्न्टिट्यूट , टी सी एस  आणि ऍमेझॉन सारख्या उद्योग भागीदारांसह डेटा कृतीदलाची  स्थापना केली होती.

कृतीदलाचे अध्यक्ष श्रीकांत वेलमाकन्नी यांनी, या कृतीदलाने गेल्या सहा महिन्यांमध्ये केलेले कार्य आणि त्याचे विविध पैलू उलगडून दाखवले.  खुल्या सरकारी डेटाला धोरणात्मक प्राधान्य देण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले; उच्च-मूल्य डेटासेटवर लक्ष केंद्रित करणे, डेटाचे अति-वर्गीकरण टाळण्यासाठी वाजवी डेटा वर्गीकरण धोरणे लागू करणे आणि आंतरराष्ट्रीय मानके आणि साधनांचा अवलंब करणे इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.

गौरव गोधवानी यांनी खुल्या सरकारी डेटा साठी एक व्यासपीठ तयार करण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल माहिती दिली.  सर्वाना उपलब्ध असलेला डेटा प्राप्त करणे , संग्रहित करणे आणि  हा डेटासेट उच्च-गुणवत्तेचा आहे याबद्दल खात्री करण्यात,  येणाऱ्या आव्हानांबद्दल गोधवानी यांनी माहिती दिली.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि नवोन्मेषी तज्ञांना डेटाशी संबंधित काही मोठ्या आव्हानांबद्दल उमाकांत सोनी यांनी माहिती दिली. दर्जेदार डेटासेट प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असलेले अडथळे हे  एआय सोल्यूशन्सचे व्यापारीकरण आणि वृद्धीसाठी एक अवरोधक म्हणून कसे कार्य करतात हा मुद्दा त्यांनी विशद केला आणि भारतातील एआय नवोन्मेष परिसंस्थेला चालना देण्यासाठी काही सूचना केल्या. 

हे सत्र येथे पाहिले जाऊ शकते:

भारतात झालेल्या पहिल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत 2020 मध्ये  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने  सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या उपक्रमाचा एक भाग म्हणून  " एआय पे चर्चा " ही संवादासत्रांची मालिका सुरु करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अशा उपक्रमांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर विचारमंथन सुरु झाले असून यामुळे एकूणच आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात काही सकारात्मक, मूर्त अर्थपूर्ण बदल घडून येतील.

 ***

Gopal C/B.Sontakke./CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885637) Visitor Counter : 178