कृषी मंत्रालय

खासदारांसाठी विशेष भोजनाच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रमुख उपक्रम सुरू करण्यात आला


उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसदेच्या आवारात भरड धान्य आधारित भोजनाचा आस्वाद घेतला

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या भोजनाचे आयोजन केले होते

Posted On: 20 DEC 2022 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2022

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आज संसदेच्या प्रांगणात खासदारांसाठी 'भरड धान्य आधारित खाद्यपदार्थांचा समावेश असलेले विशेष भोजन' आयोजित करून देशात आणि जगभरात याला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रमुख उपक्रम हाती घेतला.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य  वर्ष 2023 ची तयारी करण्याच्या उद्देशाने, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड , पंतप्रधान  नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती  हरिवंश, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार या 'विशेष भोजनात ' सहभागी झाले  आणि ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादीपासून बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला आणि मोकळ्या मनाने या उपक्रमाचे कौतुक केले तसेच भरड धान्य  वर्षाचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या प्रस्तावावर , संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य  वर्ष म्हणून घोषित केले आहे, जे देशभरात तसेच जगभरात  उत्साहाने साजरे केले जाईल.  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची तयारी जोरात सुरू आहे. भरड धान्याची  मागणी आणि वापर  वाढवण्याच्या उद्देशाने भरड धान्याबाबत  जनजागृती करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सर्व संबंधितांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना करत  आहे.

तोमर म्हणाले की, आपल्या प्राचीन पौष्टिक धान्याला आपल्या आहारात  पुन्हा आदराचे  स्थान मिळावे असे  पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते.  तसेच, या उपक्रमामुळे भरड धान्याची  लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना दीर्घकाळात चांगला परतावा मिळेल, असेही ते म्हणाले.

भोजनात भारतीय भरड धान्याचे वैविध्य आणि विविध पाककृतींचा समावेश करण्यात आला होता. या भोजनाबरोबरच , भरड धान्यावर  आधारित उत्पादने देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती, ज्यामध्ये रेडी टू ईट  आणि रेडी टू कुक  पदार्थांचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे  रोम (इटली) येथे अलिकडेच  आंतरराष्ट्रीय पोषक भरड धान्य  वर्षाचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय शिष्टमंडळ सहभागी झाले होते.

भरड धान्ये हे प्राचीन आणि कोरडवाहू जमिनीतील महत्त्वाचे पीक आहे. लहान दाणे असलेली ही अत्यंत पौष्टिक तृणधान्ये छोट्या शेतजमिनीत  मातीत/कमी पर्जन्यमान असलेल्या कमी सुपीक मातीत आणि खते आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून पीक घेतले जाते. मूळ भारतातील भरड धान्ये, पोषक तृणधान्ये म्हणून लोकप्रिय झाली आहेत, कारण ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पोषक घटक  प्रदान करतात.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885263) Visitor Counter : 268


Read this release in: English , Urdu , Punjabi , Odia