अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय अवकाश क्षेत्र परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळविणारे क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे : केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


आतापर्यंत भारतातून अंतराळात सोडण्यात आलेल्या एकूण 385 परदेशी उपग्रहांपैकी सुमारे 90 टक्के म्हणजे 353 उपग्रह मोदी सरकारच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात प्रक्षेपित करण्यात आले

Posted On: 20 DEC 2022 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2022

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच अणुउर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अवकाश क्षेत्र, देशातून मोठ्या संख्येने प्रक्षेपित होणाऱ्या परदेशी उपग्रहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळविणारे क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे.

संसद टीव्ही या वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, आतापर्यंत भारतातून अंतराळात सोडण्यात आलेल्या एकूण 385 परदेशी उपग्रहांपैकी सुमारे 90 टक्के म्हणजे 353 उपग्रह मोदी सरकारच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून भारताला मिळालेल्या एकूण 220 दशलक्ष युरोंच्या परकीय चलनापैकी 187 दशलक्ष युरोंची कमाई गेल्या आठ वर्षांत झाली आहे. हे प्रमाण युरोपिय देशांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणातून मिळालेल्या उत्पन्नाच्या सुमारे 85% आहे.

इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने व्यावसायिक शाखेच्या माध्यमातून पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही-एमके 3 या प्रक्षेपकांचा वापर करून अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन ,इटली,जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील,कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, लिथुआनिया, लक्झेम्बर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, कोरिया, सिंगापूर,स्पेन,स्वित्झर्लंड इत्यादी प्रगत देशांचे उपग्रह देखील प्रक्षेपित केले आहेत ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

नव्या अवकाश धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या धोरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून अशा प्रकारच्या सर्व कार्यांसाठी व्यापक आणि स्पष्टपणे परिभाषित धोरणाच्या माध्यमातून देशातील अवकाशविषयक प्रक्रियांसाठी अपेक्षित, भविष्यकालीन, सक्षम नियामक व्यवस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने विभाग पावले उचलत आहे.

तसेच, अवकाशविषयक विविध उपक्रमांच्या परिचालनासाठी बिगर-सरकारी संस्थांना प्रोत्साहन आणि सहकारी संबंध निर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या आयएन-एसपीएसीई या एक खिडकी व्यवस्थेमुळे स्टार्ट-अप समुदायामध्ये या क्षेत्राबद्दल लक्षणीय रुची निर्माण झाली आहे. आयएन-एसपीएसीईच्या डिजिटल मंचावर आतापर्यंत अवकाश क्षेत्रातील 111 स्टार्ट अप उद्योगांची झालेली नोंदणी हा त्याचाच पुरावा आहे असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.

देशातील अवकाश कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्याच्या आणि या क्षेत्राला अधिक उंचीवर घेऊन जाण्याच्या उद्देशाने सरकारने गेल्या आठ वर्षांत अनेक पावले उचलली असून या संदर्भातील अनेक अडथळे दूर केले आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की आज अवकाश तंत्रज्ञानाने अगदी प्रत्येक घरात आभासी स्वरुपात प्रवेश केला आहे कारण आता या तंत्रज्ञानाचा वापर कृषी, मृदा, जलस्त्रोत, जमिनीचा वापर/ भूआच्छादन, ग्रामीण विकास, पृथ्वी आणि हवामानविषयक अभ्यास, भूविज्ञान, शहरी तसेच पायाभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापनविषयक पाठबळ, वनीकरण इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च क्षमतेच्या रिझोल्यूशन प्रतिमांचा वापर करुन रेल्वे मार्गात अडथळा निर्माण करु शकणाऱ्या वस्तूंविषयी धोक्याचा इशारा देऊ शकल्याने रेल्वे अपघात टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे मोठे वरदान देखील ठरत आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र प्रधान म्हणाले की, साचेबध्द विचारांपेक्षा वेगळा दृष्टीकोन स्वीकारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन इस्रोने 2016 मध्ये विविध मंत्रालयांच्या गरजा समजून घेण्यासाठी तसेच त्यापैकी प्रत्येक विभाग आणि मंत्रालयाला त्यावर उपाययोजना पुरविता याव्यात म्हणून एका विचारमंथन सत्राचे आयोजन केले होते. या अत्यंत दूरदर्शी बैठकीतील चर्चेचा परिणाम म्हणून आज आपण महामार्ग, इमारत बांधणी आणि स्मार्ट शहरे उभारणी अशा प्रकल्पांमध्ये देखील अवकाश तंत्रज्ञानाचा वापर होताना पाहतो आहोत असे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1885261) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali