श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचा वेतनपट डाटा: ऑक्टोबर 2022 या महिन्यात योजनेच्या सदस्यसंख्येत 12.94 लाख सदस्यांची भर
Posted On:
20 DEC 2022 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2022
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने आज, 20 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्कालिक डाटा अहवालातून अशी माहिती मिळाली आहे की, ऑक्टोबर 2022 मध्ये ईपीएफओ संघटनेमध्ये 12 लाख 94 हजार नव्या सदस्यांची निव्वळ भर पडली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील आकडेवारीशी तुलना केल्यास असे दिसून येते की ऑक्टोबर 2022 मध्ये वेतनपट सदस्य संख्येत सुमारे 21,026 ची निव्वळ वाढ झाली आहे.आकडेवारीनुसार, सुमारे 2,282 नवीन आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळावे यासाठी प्रथमच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, 1952 अंतर्गत पालन करण्यास सुरुवात केली आहे.
महिन्याभरात जोडल्या गेलेल्या एकूण 12.94 लाख सदस्यांपैकी सुमारे 7.28 लाख नवीन सदस्यांना प्रथमच ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा कवचा अंतर्गत समाविष्ट केले आहे. नवीन सदस्यांमध्ये 18-21 वयोगटातील सर्वाधिक 2.19 लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल 22-25 वयोगटातील 1.97 लाख सदस्यांची नोंदणी झाली. जोडल्या गेलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी, अंदाजे 57.25% हे 18-25 वर्षे वयोगटातील आहेत.
महिन्याभरात, अंदाजे 5.66 लाख सदस्य बाहेर पडले, परंतु ईपीएफओमधे समाविष्ट आस्थापनांमधील नोकऱ्या बदलून ते पुन्हा ईपीएफओमधे सामील झाले आणि खाते बंद करण्याचा पर्याय निवडण्याऐवजी मागील पीएफ खात्यातून चालू खात्यात त्यांचे निधी हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला.
लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की वेतनपटात ऑक्टोबर 2022 मध्ये 2 लाख 63 हजार महिला सदस्यांची भर पडली आहे. यापैकी 1.91 लाख महिला प्रथमच ईपीएफओमधे सहभागी झाल्या आहेत, हे प्रमाण महिन्याभरात सहभागी एकूण महिला सदस्यांच्या 72.73% आहे.
महिन्यातील निव्वळ राज्यनिहाय वेतनपट अहवालातील आकडेवारी पाहता, सर्व वयोगटातील एकूण निव्वळ वेतनपट सहभागींमधे शीर्ष पाच राज्यांचा वाटा 60.15% आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांनी महिनाभरात अंदाजे 7.78 लाख निव्वळ सदस्य जोडले आहेत.
वेतनपट अहवालाची आकडेवारी तात्पुरती आहे कारण अहवाल निर्मिती, कर्मचाऱ्यांची माहिती अद्यायावत करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे दर महिन्याला आकडेवारी अद्ययावत केली जाते. एप्रिल-2018 या महिन्यापासून, ऑक्टोबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट अहवाल ईपीएफओ जारी करत आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, 1952 अंतर्गत समाविष्ट असलेल्या देशातील संघटित कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा निधीच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885224)
Visitor Counter : 904