संरक्षण मंत्रालय

संपूर्णपणे देशी बनावटीच्या स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस मुरगाव या पी15बी श्रेणीच्या दुसऱ्या युद्धनौकेचा संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत नौदलाच्या ताफ्यात समावेश


अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज असलेल्या या युद्धनौकेमुळे देशाच्या सागरी क्षमतांमध्ये वाढ होईल आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण होईल- राजनाथ सिंह

Posted On: 18 DEC 2022 2:16PM by PIB Mumbai

 

पी15बी श्रेणीतील आयएनएस मुरगाव (डी67) ही दुसऱी स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत नौदलाच्या गोदीत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. विशाखापट्टणम श्रेणीच्या चार विनाशिकांपैकी भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरो या स्वतःच्या संस्थेद्वारे संपूर्णपणे देशी बनावटीची रचना केलेल्या आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएल) ने बांधलेल्या दुसऱ्या युद्धनौकेचा समारंभाच्या माध्यमातून ताफ्यात औपचारिक समावेश करण्यात आला.

 

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस मुरगाव ही युद्धनौका संपूर्णपणे देशी बनावटीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक असल्याचे सांगितले आणि यामुळे देशाच्या सागरी क्षमतांमध्ये वाढ होईल आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण होईल, असा विश्वास व्यक्त केला. आयएनएस मुरगाव ही जगातील सर्वाधिक अत्याधुनिक क्षेपणास्त्र वाहक युद्धनौकांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. यामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त देशी बनावटीची सामग्री असलेली ही युद्धनौका म्हणजे युद्धनौकांची रचना आणि उत्पादन यामध्ये भारताने मिळवलेल्या प्राविण्याचा  दाखला आहे आणि देशी बनावटीच्या  संरक्षण उत्पादनांमध्ये वाढणाऱ्या क्षमतेचे झळाळते उदाहरण आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या देशाच्या त्याचबरोबर आपल्या मित्र देशांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजांची ही युद्धनौका पूर्तता करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या हितांचे रक्षण करणे ही भारतीय नौदलाची प्रमुख भूमिका आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा थेट संबंध वाढत्या  व्यापाराशी आहे ज्यापैकी बहुतांश व्यापार सागरी मार्गाने चालतो. आपल्या हितांचा संबंध थेट हिंदी महासागरासोबत आहे.

या भागातील एक महत्त्वाचा देश असल्याने त्याच्या सुरक्षेमध्ये भारतीय नौदलाची जबाबदारी आणखी महत्त्वाची ठरते, असे ते म्हणाले. 

असामान्य धैर्य आणि समर्पित वृत्तीने आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या संरक्षण दलांची त्यांनी प्रशंसा केली. भारताच्या अभूतपूर्व प्रगतीचा ही दले कणा आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारत दररोज नवी शिखरे सर करत आहे आणि दर दिवशी नव्या उंचीवर पोहोचत आहे. आपण आता जगातील पहिल्या पाच  अर्थव्यवस्थांपैकी एक बनलो आहोत.

बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या देशाला सज्ज ठेवण्याचा सरकारने संकल्प केला आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे/ उपकरणे यांच्यासह देशाच्या संरक्षण दलांच्या सुरक्षाविषयक  पायाभूत सुविधा बळकट करत राहण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवनवीन युद्धनौकांची सातत्याने बांधणी करून आपल्या क्षमतेचा विस्तार केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी एमडीएलची प्रशंसा केली. देशी बनावटीच्या जहाजबांधणीमध्ये सरकारने सुरू केलेल्या उपक्रमांचा लाभ घेत आपल्या क्षमतांमध्ये वाढ करावी आणि भारताला देशी बनावटीच्या जहाज बांधणीचे केंद्र बनवण्यासाठी पुढे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी एमडीएल आणि इतर जहाजबांधणी कंपन्यांना केले.

 

यावेळी बोलताना नौदलप्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार म्हणाले की आयएनएस मुरगाव चा नौदलात समावेश म्हणजे भारताने युद्धनौकांची रचना आणि उभारणीच्या क्षमतेमध्ये गेल्या दशकात टाकलेल्या मोठ्या पावलांचे निदर्शक आहे. ही युद्धनौका खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे प्रदर्शन करत आहे आणि  भारताचे जागतिक जहाज बांधणी केंद्रात रुपांतर करण्याच्या नौदलाच्या वचनबद्धतेला अधिक बळकट करत आहे, असे ते म्हणाले.

या प्रसंगी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी, नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ, पश्चिम नौदल कमांड तसेच व्हाईस ऍडमिरल नयन प्रसाद (निवृत्त), सीएमडी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884574) Visitor Counter : 243