पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
नवी दिल्ली येथे आयोजित 7व्या पेट्रोकेमिकल संमेलनाच्या पूर्ण सत्रामध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले मार्गदर्शन
Posted On:
17 DEC 2022 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे आयोजित 7व्या पेट्रोकेमिकल संमेलनाच्या पूर्ण सत्रामध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज मार्गदर्शन केले. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पेट्रोलियम क्षेत्रात असलेल्या संधी आणि आव्हाने यांवर हितधारकांमध्ये विचारमंथन घडवून आणणे आणि उर्जा संक्रमण, खनिज तेल ते रसायने, उद्योग 4.0, उदयाला येणारे हरित उपाय आणि चक्राकार अर्थव्यवस्था यांसारख्या शक्तींवर होणाऱ्या परिणामांबाबत व्यापक संवाद घडवून आणणे हा या संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
या पूर्ण सत्रामध्ये बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, भारतातील पेट्रोलियम बाजारपेठेचे मूल्य सध्या 190 अब्ज डॉलर आहे तर पेट्रोलियम क्षेत्रातील उत्पादनांचा दरडोई खप विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही तफावत मागणीच्या वृद्धीला आणि गुंतवणुकीच्या संधींना मोठ्या प्रमाणात अवकाश उपलब्ध करून देत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या उपक्रमाला पेट्रोकेमिकल क्षेत्र पाठबळ देत आहे आणि भारताचे जागतिक उत्पादन केंद्रामध्ये परिवर्तन करण्याची त्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. वाढत्या लोकसंख्येकडून सातत्याने वाढणारी मागणी आणि झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था हा पेट्रोकेमिकल क्षेत्राच्या वृद्धीला चालना देणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी नमूद केले.
सातत्याने वाढणाऱ्या जागतिक पेट्रोकेमिकल मागणीत भारत 10% योगदान देईल. या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी स्वयंचलित मार्गाद्वारे 100% परदेशी गुंतवणुकीसह सरकारने अनेक धोरणे तयार केली आहेत, असे पुरी यांनी सांगितले.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की पेट्रोकेमिकलसारख्या क्षेत्रांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या यशोगाथेमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे आणि यापुढेही देत राहतील.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884486)
Visitor Counter : 229