आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भावी पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा पुनरुच्चार

Posted On: 15 DEC 2022 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नाच्या फलस्वरूप गेल्या आठ वर्षांत एम बी बी एस च्या जागांमध्ये लक्षणीय 87% तर पदव्युत्तर जागांमध्ये 105% वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. देशातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच्या केंद्र सरकारच्या वाचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी केला. भावी पिढीला उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने वर्ष 2014 पासून देशात अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, असे  ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून आपल्या विद्यार्थ्यांना परवडणारे दर्जेदार शिक्षण आणि सहजरीत्या प्राप्त होईल असे प्रशिक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले आहेत. असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील मोठ्या बदलाविषयी माहिती देताना डॉ. मांडविया म्हणाले की, “2014 मध्ये भारतात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती आणि ही व्यवस्था  अनेक समस्यांनी ग्रासलेली होती.

मोदी सरकारच्या काळात इनपुट-आधारित ते परिणाम-आधारित दृष्टिकोन असा लक्षणीय आणि गतिमान बदल झाला आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

परिणामी, केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येतील वाढ पहिली तर त्यात तब्बल 96% वाढ होऊन 2022 मध्ये ही संख्या 648 इतकी झाली आहे. 2014 पासून खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 42% वाढ झाली आहे. सध्या देशातील 648 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 355 सरकारी आणि 293 खाजगी आहेत.

निष्पक्ष परीक्षा आणि निवड प्रक्रियेसाठी, 2016 मध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा-राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षा (NEET) 'एक देश, एक परीक्षा, एक गुणवत्ता' प्रणाली आणि एक सामायिक समुपदेशन प्रणाली सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील कोणत्याही भागातील विद्यार्थ्याला  त्याच्या गुणवत्तेनुसार कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्याची संधी मिळू शकते.

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातूनच शाळांमध्ये 4.5 लाख शौचालये बनवण्यात आली आणि शाळा गळतीचे प्रमाण, विशेषत: मुलींच्या, देशात 17% वरून 13% पर्यंत कमी झाले” असे केंद्र सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करून डॉ मनसुख मांडवीया यांनी सांगितले.

 

* * *

S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883767) Visitor Counter : 170