माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांनी काशी आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंध पुनरुज्जीवित केले: अनुराग ठाकूर
काशी आणि शिवकाशी यांच्यातील संस्कृती, परंपरा आणि नावे या सर्वांमध्ये साधर्म्य: अनुराग ठाकूर
Posted On:
11 DEC 2022 8:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काशी आणि शिवकाशी यांच्यातील प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंध पुनरुज्जीवित केले आहेत, असं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. वाराणसी इथे सुरु असलेल्या काशी-तामिळ संगममचा भाग म्हणून,बनारस हिंदू विद्यापीठात सुरु असलेल्या, सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान, ते बोलत होते. काशी-तमिळ संगमम हा उपक्रम राबवल्याबद्दल, त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या या उपक्रमाअंतर्गत, तामिळनाडूच्या विविध भागातील लोक वाराणसीला येत आहेत. या उपक्रमात, खेळांचा समावेश करुन, त्यांनी युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे. यातून, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ संकल्पनेत खेळांचे असलेले महत्त्व स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. एखाद्या क्रीडास्पर्धेत, जिंकणे किंवा हरणे फार महत्वाचे नसते,पण अशा मैत्रीपूर्ण सामन्यातून युवकांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. जरी आपल्याला एकमेकांची भाषा येत नसली, तरीही आपण संवाद साधू शकतो आणि एकमेकांना जाणून घेऊ शकतो.
ठाकूर यांनी यावेळी अमृतकाळाविषयीची पंतप्रधानांची दृष्टी उलगडून संगितली. आपण (नागरिकांनी) केवळ आपल्या अधिकारांचा विचार करु नये, तर आपल्या कर्तव्यांचेही पालन करावे, असे ते म्हणाले. वाराणसीमध्ये गेल्या आठ वर्षांत ज्या दर्जाची विकासकामे झाली आहेत, तशी आधी कधीच दिसली नव्हती. हा विकास केवळ वाराणसीतच नाही, तर सगळ्या देशभर दिसतो आहे. याआधी कोणीही काशी-तामिळ संगमम बद्दल विचार केला नव्हता. तामिळनाडूमध्ये अशी अनेक गावे आहेत, जसे की टेनकाशी, शिवकाशी, जी काशीशी जोडलेली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ही तर फक्त सुरुवात आहे, आज जे 2500 लोक तामिळनाडूमधून काशीला आले आहेत, ते पुढे 25 हजार पर्यटकांना काशीला घेऊन येतील. हा संगम यशस्वी करण्यासाठी ज्या विविध मंत्रालयांनी एकत्रित काम केले त्यांच्या प्रयत्नांची ठाकूर यांनी प्रशंसा केली. तामिळनाडूची कला, संस्कृती आणि साहित्य अधिकाधिक लोकप्रिय करावं असं आवाहनही त्यांनी केलं.
काशीशी सांस्कृतिक दृष्ट्या जवळीक असलेल्या, तामिळनाडूमधील शिवकाशीसारख्या ठिकाणाला भेट देण्याचं आवाहन, अनुराग ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील लोकांना केलं. काशीचा तामिळनाडूतील अनेक शहरांशी जुना संबंध असल्याचं ते म्हणाले. हा जुना संबंध, पंतप्रधानांनी पुनरुज्जीवीत केल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी सोमनाथ, केदारनाथ आणि अयोध्येतील मंदिरं भव्य आणि दिव्य बनवली आहेत, त्याचप्रमाणे ते काशीला सुद्धा वैश्विक दिव्य भव्य काशी बनवतील. इथलं पर्यटन वाढलं आहे असंही ते म्हणाले. वाराणसी मधील सिग्रा क्रीडागारात युवावर्गासाठी प्रशिक्षण आणि क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत असं सांगत, त्यांनी तंदुरुस्तीचं महत्त्व यावेळी विषद केलं. IIT मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ BHU चा सुद्धा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
क्रीडा महोत्सव:
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, तसच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज वाराणसी इथे झालेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यातील खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगनही उपस्थित होते.
अनुराग सिंह ठाकूर यांनी काशी तमिळ संगमम इथे उपस्थितांना संबोधित केलं. मणीपूरचे राज्यपाल एल गणेशन, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि मेघालयचे माजी राज्यपाल षण्मुगनाथन हे देखील यावेळी उपस्थित होते.
काशी तमिळ संगममचा एक भाग म्हणून क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. चौथ्या दिवशी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना झाला. अनुराग सिंह ठाकूर यांनी खेळाडूंचा सत्कार केला आणि तामिळनाडूच्या खेळाडूंचं वाराणसी इथे स्वागत केलं.
डॉ एल मुरुगन यांनी या सामन्यात सहभागी होत असल्याबद्दल, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या क्रिकेट संघांना शुभेच्छा दिल्या. तमिळ कवी भरथियार यांचा आज वाढदिवस आहे आणि ते वाराणसीत राहत असत, यांचं स्मरण त्यांनी यावेळी करुन दिलं. तमिळ ही त्यांना ज्ञात असलेल्या सर्व भाषांमध्ये गोड असल्याचं सांगणारी भरथियार यांची कविता त्यांनी उद्धृत केली. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेशी सुसंगत असलेला काशी तामिळ संगमम हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली.
***
S.Patil/R.Aghor/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882586)