अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते महसूल गुप्तचर संचालनालयाच्या 65 व्या स्थापना दिन सोहोळ्याचे उद्घाटन


मुंबई प्रादेशिक कार्यालयातील मिशल क्विनी डिकोस्टा आणि कोलकाता प्रादेशिक कार्यालयातील विपुल विश्वास या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल त्यांचा यावर्षीचा ‘डीआरआय शौर्य पुरस्कारा’ने गौरव

Posted On: 05 DEC 2022 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारीतील डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालय या तस्करी विरोधी गुप्तचर आणि तपास संस्थेचा 65 वा वर्धापनदिन आज नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी,  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रसंगी “भारतातील तस्करीविषयक अहवाल 2021-22” देखील प्रसिद्ध  केला :

(https://dri.nic.in/writereaddata/smuggling_in_india_report_2021_2022.pdf)

या अहवालात सोने, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ तसेच वन्यजीव इत्यादींच्या तस्करीबाबत प्रचलित पद्धतींचे तसेच व्यावसायिक घोटाळे आणि आंतरराष्ट्रीय सक्तवसुली कारवाई तसेच सहकार्य या विषयी विश्लेषण करण्यात आले आहे. डीआरआयचे महासंचालक एम.के.सिंग यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच त्यांनी गेल्या आर्थिक वर्षातील डीआरआयच्या कामगिरीसंबंधी अहवाल सादर केला.

केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी उत्कृष्ट कामगिरी आणि प्रशंसनीय सेवेबद्दल डीआरआय ही संस्था आणि त्यात कार्यरत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. डीआरआयने केलेल्या अतुलनीय कार्यामुळे इतर सक्तवसुली संस्थांसाठी कामगिरीचा मापदंड उंचावला आहे असे त्या म्हणाल्या. भारतात बाहेर देशांतून होणाऱ्या तस्करीचे, विशेषतः अंमली पदार्थ तसेच सोने यांच्या तस्करीच्या तपासावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’दरम्यान डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी देशातील 14 ठिकाणी 44,000 किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट केल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांची प्रशंसा केली. ही कामगिरी म्हणजे डीआरआयचे कार्य आणि सामर्थ्य यांचे असाधारण प्रदर्शन आहे असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातील उपसंचालक मिशल क्विनी डिकोस्टा आणि कोलकाता प्रादेशिक कार्यालयातील ज्येष्ठ गुप्तचर अधिकारी विपुल विश्वास या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल यावर्षीचा ‘डीआरआय शौर्य पुरस्कारा’ने त्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी देखील उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. अंमली पदार्थांची तस्करी आणि या पदार्थांचे युवा पिढीवर होणारे दुष्परिणाम याबद्दल चौधरी यांनी चिंता व्यक्त केली. एनडीपीएसशी संबंधित प्रकरणांमध्ये ‘नो टॉलरन्स’ अर्थात गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारे निसटून जाण्यास वाव न ठेवण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे यावर केंद्रीय मंत्री चौधरी यांनी भर दिला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881041) Visitor Counter : 157


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu