संरक्षण मंत्रालय
नौदल दिनानिमीत्त विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या प्रात्यक्षिकांचं आयोजन
पहिल्यांदाच नौदल दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे देशाच्या राजधानीबाहेर दुसऱ्या शहरात आयोजन
Posted On:
02 DEC 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या युद्धात भारतीय नौदलानं बजावलेली मोलाची भूमिका आणि 'ऑपरेशन ट्रायडंट' मधल्या भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव आणि स्मरण करण्यासाठी हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तसंच भारतानं अमृत काळाच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्याचं औचित्य साधून, यंदा रविवारी 4 डिसेंबर 2022 ला विशाखापट्टणम इथं नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी भारतीय नौदलाच्या वतीनं, त्यांच्या कार्यान्वयाच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नौदलाचं युद्धकौशल्य आणि क्षमतांचं दर्शन घडवले जाईल. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, प्रात्यक्षिकांसाठी नौदल सज्ज झालं आहे. भारताच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याशिवाय केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
पारंपरिकरित्या, नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे देशाच्या राष्ट्रपती आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला जातो. यंदा पहिल्यांदाच देशाच्या राजधानीबाहेर, नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या, विमानं तसंच नौदलाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण विभागीय नौदल कमांडमधली विशेष दले विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे आणि विविधांगी पैलूंचे दर्शन घडवतील. सूर्यास्त सोहळा आणि नांगर टाकलेल्या जहाजावरच्या रोषणाईने या कार्यक्रमाची सांगता होईल.
नौदलाविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक माहिती पोहचवणं, नौदलाच्या बाबतीत नागरींकांमध्ये अधिक सजगता निर्माण करणं, आणि राष्ट्रीय सुरक्षेत भारताचं नौदल देत असलेलं योगदान सर्वांसमोर मांडणं हे नौदल दिन साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आहे.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880577)
Visitor Counter : 234