आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘समानता’ ही संकल्पना असलेल्या यंदाच्या जागतिक एड्सविरोधी दिन कार्यक्रमाचे केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन, समावेशक अजेंड्यासाठी कृतीचे केले आवाहन
एचआयव्हीग्रस्त /पीएलएचआयव्हींसाठी राष्ट्रीय एड्स टोल-फ्री हेल्पलाइन, आजीवन मोफत ॲन्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेवा आणि नियमित व्हायरल लोड देखरेख अशी पावले सरकार उचलत आहे: डॉ. भारती पवार
Posted On:
01 DEC 2022 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2022
जागतिक एड्सविरोधी दिनानिमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे केले. या कार्यक्रमाला देशाच्या विविध भागातून आलेले तीन हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. एचआयव्हीबाधितांबरोबर राहणारे (पीएलएचआयव्ही), स्वयंसेवी संस्था, नागरी समाज संस्था, आणि युवकांचा त्यात सहभाग होता. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव एस गोपालकृष्णन हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
"1 डिसेंबर 1988 पासून जागतिक एड्सविरोधी दिन पाळला जातो. ही एड्स ग्रस्त लोकांसोबत संवेदना दाखवण्याची आणि त्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची एक संधी आहे. समानता ही यंदाच्या जागतिक एड्सविरोधी दिनाची संकल्पना आहे. एड्सविरोधी मोहिमेशी संबंधीत सर्वांसाठी कृती करण्याचे हे आवाहन आहे. देशभरातील एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) संक्रमित आणि प्रभावित लोकांमधील असमानता दूर करण्यासाठी आणि एड्स (अॅक्वायरड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) संपविण्यासाठी आवश्यक व्यावहारिक कृती करण्याची आवश्यकता आहे.” असे भारती पवार यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले.
सामाजिक समावेशकता वाढवण्यावर आणि एचआयव्हीचा सामना करण्यासाठी बहुक्षेत्रीय दृष्टिकोन वापरण्यावर डॉ. पवार यांनी आपल्या संदेशातून भर दिला.
नागरी संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या युवकाच्या सर्जनशील प्रयत्नांचा उपयोग केला पाहिजे. रेड रिबन क्लब महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि अशा 12,500 हून अधिक क्लबचा उपयोग मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. एचआयव्ही/ एडस् आणि एसटीडी (लैंगिक संक्रमित रोग) याने ग्रस्त असलेल्यांनी संबंधितांशी अधिकाधिक संपर्क साधावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारती पवार यांनी केला. राष्ट्रीय एड्स टोल-फ्री हेल्पलाइन, आजीवन मोफत ॲन्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेवा आणि एचआयव्ही /पीएलएचआयव्ही साठी नियमित व्हायरल लोड मॉनिटरिंग ही काही पावले त्यासाठी उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पवार यांनी बाधित लोकसंख्येवरील भेदभाव कमी करण्याची गरजही अधोरेखित केली. या संदर्भात सरकारने "आस्थापनांसाठी एचआयव्ही आणि एड्स धोरण 2022" अधिसूचित केले आहे.
कार्यक्रमात अनेक अहवाल प्रसिद्ध करण्यात आले:
- संकलकची चौथी आवृत्ती (2022): राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम अर्थात एनएसीपीचा प्रमुख अहवाल. राष्ट्रीय एड्स प्रतिसादाची स्थिती हा अहवाल दर्शवितो.
- देखरेख ठेवणे आणि एपिडेमियोलॉजीचे तीन अहवाल, ट्रान्सजेंडर आरोग्यावर श्वेतपत्रिका,
- प्रतिबंध प्रगती अहवाल 2021-22 , राष्ट्रीय डिजिटल भांडार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अर्थात एनएसीओचे नॅशनल डेटा हब संबंधीचे अहवाल यावेळी जारी करण्यात आले. ,
- कलंक आणि भेदभावविरोधी मोहीम: एचआयव्ही-संबंधित कलंक आणि भेदभाव दूर करण्यासाठी देशव्यापी मोहीम (#अब नहीं चलेगा) सुरू केली जात आहे.
कार्यक्रमात देशभरातील लोकगटांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि राज्यांतील कलाकारांचा हुनर हाट देखील झाला. एचआयव्हीग्रस्तांचे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकतेवर हुनर हाटने भर दिला. कौशल्य वाढवून भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्यामुळे ते अधिक सक्षम होतील, यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880387)
Visitor Counter : 223