माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

क्लीन-ए-थॉन उपक्रमाचे बोधवाक्य “ना गंदगी करूंगा, ना करने दूंगा” हे आहे


"स्वच्छ आणि हरित गोव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत" - मुख्यमंत्री डॉ प्रमोद पी सावंत

"स्वच्छ गोवा हे भारताची पर्यटन राजधानी बनू शकते" अमृता फडणवीस, संस्थापक, दिव्याज फाउंडेशन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मिरामार किनाऱ्यावर क्लीन-ए-थॉनचा प्रारंभ करण्यात आला

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2022

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -इफ्फी, 2022 च्या समारोपाच्या दिवसाची सुरुवात मिरामार बीचवर आयोजित स्वच्छता मोहिमेने झाली. दिव्याज फाऊंडेशन आणि भामला फाऊंडेशन यांनी गोवा सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेला क्लीन-ए-थॉन हा आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे मूल्य रुजवणारा उपक्रम आहे. तो केवळ गोवा राज्यातील रहिवाशांसाठीच नाही तर पर्यटकांसाठी देखील आहे.

आज सकाळी मिरामार  समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून  सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचं नेतृत्व  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पी सावंत, दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापक  अमृता फडणवीस, गोवा मंत्रिमंडळाचे   सदस्य यांनी केलं.  बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ, करण कुंद्रा आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनीही  क्लीन-ए-थॉनमध्ये भाग घेतला.

या मोहिमेचा प्रारंभ करताना डॉ. सावंत म्हणाले, “आपण आपले समुद्रकिनारे स्वच्छ ठेवतो, मात्र या उपक्रमाचा उद्देश पर्यटकांपर्यंत पोहोचणे हा देखील आहे.  आपण गोवा स्वच्छ आणि हरित तेव्हाच ठेवू शकतो, जेव्हा गोव्याच्या लोकसंख्येचा खूप मोठा भाग असलेले पर्यटक देखील या प्रयत्नात सहभागी होतील. आपली नील अर्थव्यवस्था आहे,  नदी आणि समुद्राचे पाणी स्वच्छ ठेवणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी पाणी प्रदूषित करू नये.”

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानाचा उद्देश 104 किलोमीटर लांबीची  गोव्याची किनारपट्टी स्वच्छ ठेवणे  हा  आहे. या अभियानांमध्ये विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी नेहमीच सहभाग नोंदवला  आहे आणि आता जेव्हा पर्यटक यात सहभागी होतील , तेव्हा स्वच्छतेचे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल.” त्यांनी नमूद केले की त्यांच्या सरकारची पर्यावरणीय उद्दिष्टे केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित नाहीत तर महामार्ग आणि नगरपालिकांसाठी देखील लागू आहेत. या संदर्भात ते म्हणाले, “स्वच्छ आणि हरित गोव्यासाठी आम्ही कटिबद्ध  आहोत आणि यापुढेही राहू.”

या क्लीन-ए-थॉन उपक्रमाचा उद्देश केवळ जागरूकता निर्माण करणे नाही तर प्रत्यक्ष कृती करणे देखील आहे. आज सकाळी समुद्रकिनारी उपस्थित मान्यवर आणि स्वयंसेवकांनी केलेल्या स्वच्छता कामांमधून हे  स्पष्ट होते.

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “ आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची गोव्याची संस्कृती आहे, परंतु आपल्याला माहित असलेले धडे सुधारणे हे देखील  महत्त्वाचे आहे, म्हणूनच या उपक्रमाचा उद्देश  कचरा न टाकण्याची प्रत्येकाला आठवण करून देणे हा आहे, जेणेकरून आपण निरोगी सागरी जीवन अनुभवता येईल , आणि आपल्या मुलांसाठी एक उत्तम वसुंधरा आपण राखू  .‘ना गंदगी करूंगा, ना करने दूंगा ' हे या मोहिमेचे बोधवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले.  या उपक्रमामुळे गोवा भारताची पर्यटन राजधानी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गोव्यात स्वच्छतेच्या उपक्रमात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यातून या  उपक्रमामागची भावना दिसून येते , जी केवळ सरकारच नव्हे  तर विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि पर्यटकांनाही गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1879598) Visitor Counter : 285