माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

53 व्या इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा मधील चित्रपट ‘मेजर’ मध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्यांना आणि एनएसजीच्या विशेष पथकाच्या कमांडोना भावपूर्ण श्रद्धांजली


संदीपचे पालक आमच्या चित्रपटाचे पहिले प्रेक्षक होते, त्यांची प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाची होती; हा चित्रपट बघून ते हेलावून गेले: दिग्दर्शिका शशी किरण टिक्का

राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांनी हॉटेलमध्ये जाऊन आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांची सत्यकथा आम्हाला दाखवायची होती: चित्रपटातील प्रमुख अभिनेता आणि पटकथा लेखक आदिवी शेष

Posted On: 27 NOV 2022 10:39PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

 

26 नोव्हेंबर 2008. हा दिवस कोणीही भारतीय कधीही विसरू शकत नाही. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर याच दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, आणि संपूर्ण देशाला त्यांनी हादरवून टाकले. याच दुर्दैवी दिवशी,  आपल्या देशाच्या नागरिकांचे जीव वाचवतांना, दहशतवाद्यांशी झालेल्या लढाईत, मेजर संदीप उन्नीकृष्णन, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विजय साळसकर यांच्यासह अनेक सुरक्षा रक्षक या लढ्यात शाहिद झाले होते.

सगळा देश ह्या हल्ल्याला 14 वर्षे झाल्याचे स्मरण करत असतांना, शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावरील हिन्दी चित्रपट 53 व्या इफ्फी मध्ये दाखवण्यात आला. 

देशावर आलेल्या ह्या दु:खद संकटाच्या प्रसंगी दहशतवाद्यांशी लढा देतांना आपल्या जवानांनी आणि पोलिसांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी त्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, या सगळ्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.  तेलुगू दिग्दर्शक शशी किरण टिक्का यांचा ‘मेजर’हा चित्रपट, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्यांना आणि एनएसजी च्या विशेष पथकाच्या कमांडोना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा आहे. आज हा चित्रपट इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा विभागात दाखवण्यात आला.

पत्रसूचना कार्यालयाद्वारे आयोजित इफ्फीच्या 'टेबल टॉक्स'मध्ये मीडिया आणि प्रतिनिधींशी संवाद साधताना, दिग्दर्शकाने सांगितले की या चित्रपटातून, केवळ जवान संदीपची नाही, तर त्यामागच्या एका उत्तम व्यक्तीची कथा सांगण्याचा त्यांचा मानस आहे. “या चित्रपटासाठी, आम्ही खूप संशोधन, अभ्यास केला. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा पथकातील तसेच सातव्या बिहार रेजिमेंटच्या संदीपच्या सहकाऱ्यांना भेटलो. संदीप जिथे शिकला त्या शाळेतही आम्ही गेलो, जिथे तो बसायचा तो बेंचही पाहिला. संदीपच्या आयुष्याचे जेवढे पैलू मी उलगडत गेलो, तेवढा मी संदीप या व्यक्तीशी अधिकाधिक जोडला जात गेलो.”

एखाद्या दिग्दर्शकासाठी आणि त्याच्या चमूसाठी, सर्वात कठीण गोष्ट ही होती, की  जिथे आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो, तिथेच, म्हणजे बंगळुरूमध्ये मेजर संदीप यांचे पालक होते. “आमच्यासाठी तो अत्यंत भावनिक क्षण होता. संदीपचे पालक आमच्या या चित्रपटाचे पहिले प्रेक्षक होते. त्यांची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. हा चित्रपट बघून ते खरोखरच हेलावून गेले होते.”

चित्रपटाचे पटकथा लेखक आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणारे आदिवी शेष यांनी ही भूमिका आपण का स्वीकारली याचे कारण सांगितले. ते म्हणाले  की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या चेहऱ्याशी आणि एकूण व्यक्तिमत्वाशी असलेले साधर्म्य हे ही भूमिका स्वीकारण्यामागील एक कारण होते,म्हणूनच, संदीपच्या पालकांनी मला या भूमिका साकारण्यासाठी होकार दिला.

“या महान जवानाला श्रद्धांजली वाहण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नव्हता. मल्याळम भाषेत डब केलेला सिनेमा व्यावसायिक कारणांऐवजी केवळ संदीपच्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून करण्यात आला आहे.”

प्रश्नांना उत्तर देताना, आदिवी शेष यांनी स्पष्ट केले की हा चित्रपट 26/11 च्या घटनेवर नाही, तर मेजर संदीपच्या कथेवर आहे, त्याच्या जीवनातील विविध पैलू समोर आणतो.

“आम्ही मेजर संदीपच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले, कारण एनएसजी कमांडो हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी सहकारी नागरिकांचे प्राण वाचवल्याची खरी कहाणी सांगायची होती. अनेक चित्रपटांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दहशतवाद्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे; त्यांना काय वाटते ते चर्चा करतात.”

हॉटेल मुंबई सारख्या चित्रपटात, एनएसजीचे लोक हल्ल्याच्या शेवटी येतात, असे दाखवले आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असेही दिग्दर्शकानी स्पष्ट केले.

आदिवी शेष यांनी पुढे स्पष्ट केले की मेजर संदीप यांचे बलिदान दाखवून प्रेक्षकांना दुःखी करणे हे त्यांचे उद्दिष्ट नाही, तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, जेव्हा त्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशाचे रक्षण केले तेव्हा त्यांना जाणवलेल्या भावनांचे चित्र जगणे आणि अनुभवणे हे होते.

 

कथासार:  

मेजर हा मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, ज्यांनी 2008 मध्ये मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या उच्चभ्रू स्पेशल ऍक्शन ग्रुपमध्ये काम केले आणि त्यांचे प्राण वाचवले. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते.

या चित्रपटात मुंबईवर झालेला भयंकर दहशतवादी हल्ला आणि दुर्दैवाने या प्रक्रियेत स्वत:चा जीव गमावून त्याने वीरतेने कसे जीव वाचवले हे दाखवले आहे. 

 

दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविषयी

शशी किरण टिक्का हे  एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत, मुख्यतः तेलुगु चित्रपट उद्योगातील. त्याचे दिग्दर्शनातील पदार्पण थ्रिलर गुडचारी (2018) या चित्रपटाद्वारे झाले होते.

सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन ही सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या मोशन पिक्चर ग्रुपची स्थानिक-भाषेतील निर्मिती शाखा आहे जी जगभरातील 13 जागतिक प्रदेशांमध्ये दरवर्षी 30 हून अधिक चित्रपट प्रदर्शित करते. 


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1879431) Visitor Counter : 165


Read this release in: Urdu , Tamil , English , Hindi