माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53 व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या परीक्षक (ज्यूरी) मंडळाचा प्रसारमाध्यमे आणि प्रतिनिधींशी संवाद
चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागची कल्पना पर्यायांचे वैविध्य सादर करणे: आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या ज्यूरी मंडळाचे अध्यक्ष नादव लॅपीड
चित्रपट मोठ्या पडद्यावर जाऊन बघा: ज्यूरी सदस्य जेवियर अँगुलो बार्चुरेन
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट एका मंचावर आणण्यासाठी इफ्फीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था आवश्यक आहे: ज्युरी सदस्य सुदीप्तो सेन
चित्रपटांमध्ये महिलांना दिल्या जाणार्या भूमिका म्हणाव्या तितक्या सन्माननीय नाहीत: ज्युरी सदस्य पास्केल चॅव्हन्स
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
चित्रपट महोत्सवांच्या आयोजनामागची मुख्य संकल्पना एकाच प्रकारचे चित्रपट दाखवणे नाही, तर पर्यायाचे वैविध्य दाखवणे आहे, असे मत, इस्रायली दिग्दर्शक, लेखक आणि 53 व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नादाव लापीड यांनी म्हटलं आहे. 53 व्या इफ्फीदरम्यान, पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ कार्यक्रमात ते बोलत होते.
अनेक चित्रपट महोत्सव आता मिश्र पद्धतीने म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत असले, तरीही मोठ्या पडद्यावर चित्रपट बघणे हा विशेष आनंददायी अनुभव असतो, असेही नादाव लापीड म्हणाले. “मोठ्या पडद्यावर, एकत्रित उत्तम सिनेमा बघणे, हे मानवतेच्या सर्वोच्च उपलब्धीपैकी एक आहे.” असे ते पुढे म्हणाले.
इफ्फी आणि इतर चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या तुलना कशी कराल, या प्रश्नावर उत्तर देतांना, नादाव लापीड म्हणाले, की प्रत्येक चित्रपट महोत्सवाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते आणि तो इतरांपेक्षा वेगळा असतो, त्यामुळे त्यांची तुलना करणे कठीण आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या चित्रपटांचा दर्जा उत्तम होता, असे मत ज्यूरी सदस्यांनी व्यक्त केले, मात्र त्याचवेळी, निवड करतांना सुधारणा करण्यास नेहमीच वाव असतो, यावरही त्यांनी सहमती व्यक्त केली.
फ्रान्सचे ज्युरी सदस्य आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर जेव्हियर अँगुलो बार्टुरेन यांनी इफ्फी मध्ये गर्दीने भरलेली सभागृहे आणि सिनेमाबद्दल चर्चा करणारे बरेच लोक पाहून आनंद वाटला, असे मत व्यक्त केले. प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर जाऊन चित्रपट पाहावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट यावेत हे सुनिश्चित करण्यासाठी, कायमस्वरूपी प्रोग्रामरची नियुक्ती करण्यासाठी वर्षभर प्रक्रिया आवश्यक आहे, अशी शिफारस भारतातील ज्युरी सदस्य, लेखक आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केली.
यंदाच्या वर्षी, समग्र 360 डिग्री म्हणजे सर्वआयामी चित्रपट महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी इफ्फीच्या आयोजकांचे अभिनंदन केले. “ हा मी पाहिलेला हा सर्वोत्तम आयोजन केलेला इफ्फी महोत्सव आहे. एक देश म्हणून भारताची विविधता, रंग आणि सादरीकरण हे सर्व खूप चांगले होते. महोत्सवांच्या विविध पैलूंचा विचार करता, मी निश्चितपणे म्हणू शकतो की इफ्फी हा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या समान दर्जाचा आहे. इफ्फी एक महोत्सव म्हणून अतिशय परिपक्व झाला आहे,” असे सुदीप्तो सेन म्हणाले. येत्या काही वर्षांत इफ्फीमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल या विषयावरही उत्तम चित्रपट सादर जातात, यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
चित्रपटांमधील महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या विषयावर स्पर्श करताना, फ्रान्समधील ज्युरी सदस्य आणि चित्रपट संपादक, पास्केल चॅव्हन्स म्हणाल्या की, “मी अनेक उत्तम महिला कलाकार पहिल्या, मात्र, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळेल, अशा सन्मानजनक भूमिका त्यांना मिळाल्या नाहीत.”
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटातील ज्यूरी सदस्यांमध्ये अमेरिकेतील अॅनिमेशन फिल्म निर्माता जिंको गोटोह यांचाही समावेश होता. तसेच या चर्चासत्रात सहभागी झालेले एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र बाकर म्हणाले की पणजीतील मिरामार बीचवर 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी सुरू होणाऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेशी देखील इफ्फीचा सहयोग असणार आहे.
यंदाच्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंधरा चित्रपट प्रतिष्ठित गोल्डन पीकॉकसाठी स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कारांची निवड करेल. ज्युरी 7 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फिक्शन फीचर फिल्म संग्रहातून दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्मची देखील निवड करेल.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879356)
Visitor Counter : 233