माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘रेड शूज’ हा चित्रपट मेक्सिको मधील महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचारवर बोट ठेवणारा चित्रपट

Posted On: 26 NOV 2022 7:42PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

“हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाने माझ्या मनाला खोलवर स्पर्श केला आहे. कोणत्याही महोत्सवात पडणाऱ्या टाळ्यांपेक्षा, या चित्रपट निर्मितीचा एक कलाकार म्हणून मी केलेला प्रवास माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे.” असे मत, रेड शूज (झापाटोस रोजोस)या मेक्सिकन चित्रपटाचे दिग्दर्शक, कार्लोस आयचेलमन कैसर यांनी व्यक्त केले. गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ सत्रात त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. निर्माते अलेजांद्रो डी इकाझा आणि गॅब्रिएला माल्डोनाडो आणि मुख्य अभिनेत्री नतालिया सोलियन हे ही यावेळी उपस्थित होते.

53 व्या इफ्फीमध्ये प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत स्पर्धा करणार्‍या 15 चित्रपटांमध्ये मेक्सिकोच्या  रेड शूजचा समावेश करण्यात आला आहे.

हा चित्रपट एका शेतकऱ्याच्या आयुष्याभोवती फिरतो. या शेतकऱ्याला त्याच्या मुलीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याच्या आयुष्यात ज्या घटना घडतात, त्यामुळे तो एकांतवासात आयुष्य जगत असतो. आपल्या मुलीचा मृतदेह परत आणण्यासाठी हा शेतकरी, एका वेगळ्या आणि अपरिचित जगात जाण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्या या प्रवासासोबत सिनेमाही पुढे जात राहतो. या चित्रपटाला अनेक ठिकाणी नामांकने मिळाली आहेत. तसेच, व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पुरस्कारासाठी हा चित्रपट स्पर्धेत होता.

ह्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नतालिया सोलियन या अभिनेत्रीने, आपले अनुभव सांगितले की, चित्रपट क्षेत्रात काम करण्याची तिची नेहमीच इच्छा होती, आणि ही संधी मिळाल्यामुळे, ती अतिशय आनंदात आहे. “ताचो यांच्यासोबत काम करण्यास मी अतिशय उत्सुक होती, कारण ते अतिशय सहज अभिनय करतात. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची दृष्टी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे, आणि ते भावनिकदृष्ट्याही संतुलित विचार करणारे आहेत. एक मेक्सिकन महिला म्हणून मला नेहमीच, अत्यंत संतुलित आणि संवेदनशील लोकांच्या सहवासात राहायला आवडतं. त्यामुळे, हा सिनेमा माझ्यासाठी विशेष आहे.” असं तिने सांगितलं

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रेरणा कशी मिळाली, हे सांगतांना, दिग्दर्शक कार्लोस म्हणाले की याची कल्पना  त्यांना त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या नातेसंबंधातून सुचली. “पुरुषार्थाची ऊर्जा आणि तिचा सकारात्मक पद्धतीने कसा वापर करायचा हे मांडण्याचा प्रयत्न, हा चित्रपट  करतो. मात्र, चित्रपटाची मुख्य संकल्पना महिलांवरील हिंसाचार ही आहे. मेक्सिकोमधील महिलांवर लैंगिक आधारावर होणारे हिंसाचार अधोरेखित करण्यासाठी ‘लाल शूज’  घालून सार्वजनिक  ठिकाणी वावरत निषेध नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांकडून हे शीर्षक देण्याची प्रेरणा मिळाली,”  असे त्यांनी पुढे सांगितले.   

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879169) Visitor Counter : 154