माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘आयुष्मान’ – आशेच्या महान प्रवासाबाबतची वास्तव जीवनातील कथा
“आयुष्मान या चित्रपटाच्या माध्यमातून मला एचआयव्हीबाधित रुग्णांबाबतची सामाजिक कलंकाची भावना आणि भेदभाव यांचा सामना करायचा होता”: दिग्दर्शक जेकब वर्गीस
गोवा/मुंबई, 26 नोव्हेंबर 2022
“आयुष्मान ही भारताच्या ग्रामीण भागातील वंचित समाजातल्या चौदा वर्षांच्या दोन एचआयव्ही बाधित मुलांची हेलावून सोडणारी कथा आहे.आपल्या समाजात एचआयव्ही बाधित रुग्णाशी जोडली गेलेली सामाजिक कलंकाची भावना आणि भेदभाव यांच्यातून मार्ग काढण्यासाठी ही दोन्ही मुले धावण्याच्या शर्यतीच्या आवडीचा उपयोग करून घेतात आणि त्यांच्या आजुबाजूला सकारात्मक बदल तसेच आशेची भावना पसरवतात.” गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक चर्चासत्रात 25 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक जेकब वर्गीस म्हणाले.
या चित्रपटाची निर्मिती पूर्ण करण्यासाठी लागलेल्या 6 वर्षांच्या कालावधीतील प्रवासावर प्रकाश टाकत जेकब वर्गीस म्हणाले की एचआयव्हीबाधित मुलांसाठीच्या अनाथालयात त्यांची भेट बाबू आणि माणिक या बारा वर्षांच्या दोन मुलांशी झाली. “त्यांच्यापैकी एकाला जन्मतःच टाकून देण्यात आले होते तर दुसरा त्याचे कुटुंब आणि त्यांचे भविष्य यांच्याबद्दलच्या भीतीवर मात करू इच्छित होता. त्यांची स्वतःची काहीच चूक नसताना त्यांना एचआयव्ही पॉझिटीव्ह म्हणून जन्म मिळाला, त्यांना भेटल्यावर माझ्या मनात पहिला विचार असा आला की, ही मुले पुढील आयुष्य कसे काढणार, या जगात कशी तग धरणार आणि किती काळ ती जिवंत राहणार,” ते म्हणाले, “आपल्याकडे यातल्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत.”
मात्र, वर्गीस यांना आश्चर्यात टाकत त्या दोन्ही मुलांनी मोठे धैर्य दाखविले आणि त्यांच्या अत्यंत आवडीच्या असलेल्या धावण्याच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी लढण्याचा निश्चय केला. या मुलांनी अत्यंत लहान पावले टाकत नंतर मोठे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्या दोघांनी आधी 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत यश मिळविले आहे नंतर 21 किलोमीटर अंतराच्या अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला सिद्ध केले, अशी माहिती दिग्दर्शक वर्गीस यांनी दिली.
दोन्ही मुलांच्या या प्रवासातील बारकावे सांगत वर्गीस म्हणाले की या मुलांनी अत्यंत लहान पातळीवरून सुरुवात केली. “आम्ही जसजसे या मुलांच्या जीवनप्रवासाच्या प्रवाहात पुढे जाऊ लागलो, तसतसे मी देखील या मुलांसोबत मोठा होऊ लागलो. या मुलांना त्यांच्या मोहिमेने 5 खंड आणि12 देशांमध्ये फिरण्याची संधी दिली. मी फक्त त्यांच्या मागून जात राहिलो आणि त्यांच्या जीवनातील टप्प्यांची नोंद करत राहिलो,” ते म्हणाले.
मुलांच्या ध्येयप्राप्तीत अत्यंत महत्त्वाचा घटक असणाऱ्या त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत चौकशी केल्यावर दिग्दर्शक वर्गीस म्हणाले, “खेळामध्ये सहभागी होणे हे त्या मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच एकंदर क्षमता वाढविण्याचे माध्यम ठरले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या आजाराविषयी समाजात असलेल्या दूषित दृष्टीकोनावर मात करण्यासाठी या खेळाने उत्प्रेरकाचे कार्य केले.धावण्याच्या स्पर्धेसाठी तयारी करावी लागल्यामुळे त्यांना योग्य पोषण आणि कसरत यांच्या बाबतीत सकारात्मक धोरण स्विकारण्यासाठी देखील मदत झाली.
एचआयव्ही या आजारामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांपेक्षा त्या आजाराला चिकटलेल्या कलंकाच्या भावनेमुळे होणारे मानसिक आघात जास्त मोठे असतात हे ठामपणे सांगत वर्गीस म्हणाले की, आपली काहीच चूक नसताना आपल्या कुटुंबाने आपला त्याग केला या कटू सत्यासह मोठे होताना त्यांना मानसिक पातळीवर फार मोठा लढा द्यावा लागला आहे.
दिग्दर्शक जेकब वर्गीस हे पारितोषिकप्राप्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कथाकार असून ते कन्नड सिनेमासृष्टीमध्ये त्यांच्या संवेदनशील, व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी आणि चित्रपटीय मनोरंजनाची मोठी क्षमता असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द आहेत.वर्गीस नेहमीच त्यांच्या हृदयाला स्पर्श करून कायमचा ठसा उमटविणाऱ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिसतात. असे चित्रपट निर्माण करण्यासाठी चित्रपटाचा विषय आणि तुमचे व्यक्तिमत्व या दोन गोष्टी मला प्रेरणा देतात असे ते म्हणाले.
गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फी मध्ये भारतीय पॅनोरमा विभागात नॉन-फिचर फिल्म श्रेणीत आयुष्मान या चित्रपटाचे सादरीकरण झाले.
चित्रपटाविषयी माहिती
दिग्दर्शक : जेकब वर्गीस
निर्माते: दिनेश राजकुमार एन, मॅथ्यू वर्गीस, नवीन फ्रांको
पटकथाकार :जेकब वर्गीस
सिनेमॅटोग्राफर:जेकब वर्गीस
संकलक : कलवीर बिरादर, अश्विन प्रकाश आर.
चित्रपटाची संक्षिप्त कथा :
आयुष्मान ही भारताच्या ग्रामीण भागातील वंचित समाजातल्या चौदा वर्षांच्या दोन एचआयव्ही बाधित मुलांची हेलावून सोडणारी कथा आहे. त्यांच्यापैकी एकाला जन्मतःच टाकून देण्यात आले आहे तर दुसरा त्याच्या भविष्याबद्दलच्या भीतीवर मात करण्यासाठी झगडतो आहे. धावण्याच्या आवडीने प्रेरित होऊन, ही दोन्ही मुले सामाजिक कलंकाची भावना आणि भेदभाव यांच्यातून मार्ग काढतात आणि आजूबाजूच्या समाजात जागरूकता निर्माण करून जगात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कारणीभूत ठरतात.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879104)
Visitor Counter : 239