संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) 74 वा वर्धापन दिन करणार साजरा; संरक्षण सचिवांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहिदांना वाहिली आदरांजली
Posted On:
26 NOV 2022 2:52PM by PIB Mumbai
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) ही 1948 स्थापन करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना, उद्या दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी आपला 74 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक, दिल्ली येथे संपूर्ण एनसीसी बांधवांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना संरक्षण सचिव म्हणाले, गेल्या काही वर्षांत एनसीसी वेगाने विकसित होत असून गणवेशातील या तरुणांनी राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रत्येक उपक्रमात आपला वाटा उचलला आहे. सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये कॅडेट्स मार्च पास्ट, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होत, एनसीसी आपला वर्धापन दिन,साजरा करत आहे.
केवळ एकाच संस्थेने हाती घेतलेल्या 'पुनीत सागर अभियान' सारख्या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेपासून ते एक भारत श्रेष्ठ भारत शिबिर, स्वच्छ भारत मोहीम, हर घर तिरंगा आणि एक्स योगदान (COVID मदत मोहीम) यासारख्या विविध उपक्रमांद्वारे एनसीसीने सर्वत्र आपला ठसा उमटवला आहे. अलीकडच्या काळात एक लाखाहून अधिक तरुण कॅडेट्स यात सहभागी झाले असून, देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातही एनसीसीचा विस्तार करण्यात येत आहे.यामुळे या भागातील तरुणांना सशस्त्र दलात भरती होण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
चार दशकांहून अधिक काळ युवक आदानप्रदान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 25 हून अधिक देशांमध्ये शांतता आणि एकतेचे राजदूत म्हणून आपले कॅडेट्स पाठवत, आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करणारे एनसीसी हे उत्तम व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत 30 हून अधिक राष्ट्रांमधील कॅडेट्ससाठी एनसीसीने यजमानपद भूषविले आहे.
एनसीसीचे बहुआयामी उपक्रम आणि वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम, तरुणांना स्वयं-विकासासाठी अनोख्या संधी उपलब्ध करून देतात. अनेक कॅडेट्सनी क्रीडा आणि साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देश आणि संस्थेचा गौरव वाढवला आहे.
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879067)
Visitor Counter : 207