माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी 53 मध्ये 'बीट्स अँड ऱ्हिदम' चा मास्टरक्लास


पार्श्वसंगीताने कथा सांगितली पाहिजे, व्यक्तिरेखा साकारली पाहिजे आणि प्रसंगाला न्याय दिला पाहिजे- जी व्ही प्रकाश कुमार

जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवावर, वातावरण आणि संस्कृतीवर आधारित संगीताची रचना केली तर ते संगीत अस्सल असेल- स्नेहा खानवलकर

Posted On: 25 NOV 2022 10:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

संगीत हे नेहमीच वेडं असतं. चित्रपटासाठी संगीत देण्याबाबत निश्चित आणि ठाम असे काही नियम नाहीत. कथेची आणि दिग्दर्शकाची मागणी काय आहे यावर चित्रपटाचे संगीत आधारलेले असते असे नामवंत संगीतकार आणि गायक जी व्ही प्रकाश यांनी सांगितले आहे. गोव्यामध्ये आयोजित 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “ बीट्स अँड ऱ्हिदम” यावर आयोजित मास्टरक्लासमध्ये ते आज मार्गदर्शन करत होते.

संगीताला कोणतेही सातत्य नसते ते नेहमीच प्रसंगानुरुप आणि गतीशील असते, असे जीव्ही  म्हणाले. संगीताने कथा सांगितली पाहिजे, व्यक्तिरेखा साकारली पाहिजे आणि प्रसंगाला न्याय दिला पाहिजे, थोडक्यात कथा कथनाच्या प्रक्रियेचा संपूर्ण अनुभव समृद्ध केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संगीत हा आपले आयुष्य आणि संस्कृती यांचा अत्यावश्यक भाग आहे आणि आपल्या जन्मापासूनच ते आपल्यासोबत आहे.

विविध चित्रपटांसाठी संगीतरचना करण्याच्या आपल्या स्वतःच्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले की चित्रपटाचा दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्यातील विश्वास आणि स्नेह हा यामधील महत्त्वाचा पैलू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “काही वेळा संगीत चित्रपटाच्या कथेच्या कथनाची प्रक्रिया अधिक चांगली करते तर काही वेळा एखाद्या प्रसंगात शांतताच जास्त प्रभावी वाटत असल्याने संगीत अनावश्यक ठरते, असे त्यांनी सांगितले. लोकसंगीताचे महत्त्व अधोरेखित करताना जीव्ही म्हणाले की लोकसंगीत चित्रपटातील प्रसंगांचे स्थान, संस्कृती आणि कथेचा प्लॉट यांना तर्कसंगत ठरवण्यासाठी लोकसंगीत, बोलण्याची शैली आणि शब्दांचा वापर केला जातो. एका विशिष्ट कथानकासाठी तिथल्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा विचार संगीतकाराने केला पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

संगीतकार स्नेहा खानवलकर यांनी देखील यामध्ये मार्गदर्शन केले. संगीतरचना ही एक समग्र आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यासाठी कलेविषयी अतिशय जास्त प्रेम आवश्यक असते, असे त्या म्हणाल्या.

एका उदयोन्मुख संगीतकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्नेहा म्हणाल्या की जर एखाद्याने स्वतःचा अनुभव, वातावरण आणि संस्कृती यावर संगीतरचना केली तर नेहमीच अस्सल आणि अद्वितीय ठरेल. पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक भारद्वाज रंगन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

इफ्फी 53 मधील मास्टरक्लासेस आणि प्रत्यक्ष संवादाच्या सत्रांचे आयोजन सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट(एसआरएफटीआय), एनएफडीसी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया(एफटीआयआय) आणि ईएसजी यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात येत आहे. चित्रपट क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी आणि चित्रपटप्रेमींना चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक पैलूसंदर्भात सजग करण्यासाठी यावर्षी एकूण 23 मास्टरक्लासेस आणि प्रत्यक्ष संवादाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878993) Visitor Counter : 156


Read this release in: Telugu , Tamil , English , Urdu , Hindi