माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav
iffi banner

53व्या इफ्फी मास्टर क्लास मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट संकलक श्रीकर प्रसाद यांनी संकलन प्रक्रियेतील बारकाव्यांबाबत महत्त्वाचे मुद्दे सांगितले

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीच्या अनुषंगाने ‘टू कट ऑर नॉट टू कट’ या संकलनाशी संबंधित विषयावर आधारित मास्टरक्लासमध्ये सुप्रसिध्द चित्रपट संकलक ए श्रीकर प्रसाद यांनी संकलन प्रक्रियेतील बारकाव्यांबाबत महत्त्वाचे मुद्दे सांगितले.

तुमचा लक्ष्यित प्रेक्षक कोण आहे हे माहिती करून घेण्याचे महत्व विषद करून सांगताना प्रसाद यांनी चित्रपट निर्माते, विशेषतः तरुण चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षक वर्गाला नीट जाणून घेणे गरजेचे आहे यावर विशेष भर दिला. प्रेक्षकवर्गाला नीट जाणून घेतल्यामुळे चित्रपटाचे यश सुनिश्चित होते. बहुतांश चित्रपटांच्या बाबतीत, शेवटी जेव्हा तो यशस्वी होतो आणि प्रेक्षकांकडून नावाजला जातो तेव्हाच त्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाला समाधान वाटते, असे ते म्हणाले.

चित्रपटातील अतिशयोक्ती किंवा अतिरंजितपणा बाबत बोलताना, प्रसाद म्हणाले की, अतिशयोक्तीचे प्रमाण प्रत्येक चित्रपट आणि त्यातील कलाकारांनुसार बदलते. ते म्हणाले की बड्या चित्रपटांमध्ये आम्ही प्रेक्षकांना रिझवण्यासाठी काही क्षण अतिरंजित करतो, त्याचे प्रमाण बदलत असेल, पण चित्रपटांमध्ये अतिशयोक्ती असतेच. “याचा संबंध चित्रपटाचा आनंद घेण्याशी आहे, तुम्ही त्याची विभागणी करू शकत नाही. मोठ्या प्रमाणात अतिशयोक्ती न करणे आणि प्रेक्षकांना सत्याकडे घेऊन जाता येणे महत्त्वाचे आहे,” ते पुढे म्हणाले.

विविध कोनांतून आणि वेगवेगळ्या कॅमेरांचा वापर करून केलेल्या एखाद्या दृश्याच्या एकूण चित्रीकरणाच्या आवाक्याबाबत आणि त्याच्या परिणामांबाबत बोलताना प्रसाद यांनी सांगितले की नवे चित्रपट निर्माते जोपर्यंत संकलनाच्या प्रक्रियेला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत त्यांना दृश्य कुठे कापले पाहिजे याची कल्पना येत नाही. अनेक दिग्दर्शकांना संकलनाचा अनुभव नसतो. दिग्दर्शन अधिक उत्तम प्रकारे करता यावे यासाठी पूर्वीच्या काळात दिग्दर्शकांना संकलनाचा अनुभव असणे अनिवार्य समजले जात होते. आताच्या चित्रपट निर्मिती प्रक्रियेत आपण संकलनाची क्रिया नंतर करतो. पण आता सॉफ्टवेअरच्या मदतीने अधिक काम करता येते. अर्थात या पद्धतीने आपल्याला पाहिजे तो परिणाम साधणे अधिक थकविणारे होऊन जाते असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रसाद पुढे म्हणाले की संकलन अधिक सहजतेने होण्यासाठी या सर्व गोष्टी खूप मोठी भूमिका निभावतात. शब्द नसलेले शांत दृश्यक्रम परिणामकारक असतात आणि त्यात व्यक्त झालेल्या संवेदना  ते अचूक पोहोचवतात, आणि पार्श्वसंगीतामुळे भावना देखील व्यक्त होतात.एकच चित्रपटातील एका दृश्यक्रमाची दोन वेगवेगळी स्वरूपे दाखवून एखादे दृश्य अधिक परिणामकारक आणि प्रभावी व्हावे म्हणून दिग्दर्शक कशा प्रकारे संवाद अधिक वेळ थांबवून शांत क्षण जाऊ देतात ते प्रसाद यांनी स्पष्ट केले.

गाण्याचे चित्रीकरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात या संदर्भात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद म्हणाले, “गाणी हा नेहमीच आपल्या चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग होता आणि आहे तसेच दृश्य परिणाम अधिक उंचावर नेण्यासाठी त्यांचा वापर होतो. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये गाण्याचे शब्द हा चित्रपटाच्या कथेचा भाग असायचा पण आता आपण अशा काळात आहोत की जिथे गीते सुद्धा चित्रपटाच्या कथेतील भाग झाला आहे.”

चित्रपटाचा शेवट प्रभावी करण्याच्या प्रक्रीयेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद यांनी ‘चित्रपटाचा शेवट म्हणजे त्यातील गोष्टीचा समारोप असतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा असतो’ यावर भर दिला. दुर्दैवाने आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये दोन शेवट असतात, एक मध्यंतरापूर्वी आणि दुसरा चित्रपटाच्या शेवटी. मध्यंतराला कथेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचणे आवश्यक असते, आणि कधीकधी ती इतकी वाढते की चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा पहिला भाग नंतरच्या भागापेक्षा उत्तम समजला जातो. चित्रपटातील शेवटचे दृश्य हा चित्रपटाचा परमोच्च बिंदू असतो आणि प्रेक्षक घरी जाताना या दृश्याचा परिणाम घेऊन जातात.

ओटीटी मंचावरील चित्रपटांच्या संकलन शैलीबाबत विस्तृतपणे बोलताना प्रसाद म्हणाले की तो चित्रपट आहे की मालिका यावर सगळे अवलंबून असते. मालिका लेखनाची एक वेगळी शैली असते. त्यातील प्रत्येक भाग हा एखाद्या उंच कड्यासारखा असतो आणि अशा वेळी आपल्याला अनेक मध्यंतरे आणि विविध शेवट यांच्यासह सज्ज राहावे लागते अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878966) Visitor Counter : 255
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu