माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ओटीटी आणि डिजिटल मंचामुळे अभिनय क्षेत्रात संधी वाढल्या आहेत: कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा


इफ्फी 53 मधील “इन-कन्व्हर्सेशन” सत्रात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा आणि क्षितिज मेहता झाले सहभागी

Posted On: 25 NOV 2022 8:40PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

''कास्टिंग अर्थात नाटक/चित्रपट आदींसाठी कलाकारांची निवड ही खूप जुनी प्रक्रिया आहे, मात्र कास्टिंग डायरेक्शन (दिग्दर्शन) हा स्वतंत्र विभाग असणे, ही बाब नवी आहे'', असे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सांगितले. भारतीय चित्रपट उद्योगातील कास्टिंगची प्रक्रिया आणि कास्टिंग डायरेक्टरच्या वाढत्या भूमिकेबद्दल ते बोलत होते.  कास्टिंग डायरेक्टर, हा अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. पूर्वी दिग्दर्शक आणि निर्माते जो उपलब्ध असेल त्याची भूमिकेसाठी निवड करायचे  पण आता ही प्रक्रिया अधिक व्यावसायिक झाली आहे, असे ते म्हणाले.

इफ्फी 53 मध्ये  इन कन्व्हर्सेशन‘ सत्रात कास्टिंग इन न्यू इंडियन सिनेमा’ या विषयावर बोलताना मुकेश छाब्रा

भारतीय चित्रपट उद्योगात कास्टिंग क्षेत्राला आकार देणारे मुकेश छाब्रा  आणि भारतातील कास्टिंग क्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव क्षितिज मेहता यांनी आज इफ्फी 53 मध्ये आयोजित  इन कन्व्हर्सेशन‘ सत्रात  ‘कास्टिंग इन न्यू इंडियन सिनेमा’ या विषयावर संवाद साधला. त्यांनी कास्टिंग प्रक्रियेची उत्क्रांती, भारतीय चित्रपट उद्योगातील कास्टिंग उद्योगावर  ओटीटी मंचांचा  प्रभाव आणि विशिष्ट भूमिकेसाठी कलाकारांच्या निवडीमध्ये  सोशल मीडियाचा प्रभाव यावर त्यांची मते मांडली. 

ओटीटी मंच आणि डिजिटल जगाचा भारतातील चित्रपट उद्योगातील कास्टिंगवर होणाऱ्या परिणामांविषयी  मुकेश छाब्रा  म्हणाले की, ओटीटी  आणि डिजिटल मंचाच्या  वाढीमुळे अभिनय क्षेत्रातील संधींमध्ये वाढ झाली आहे. डिजिटलमुळे प्रयोगाला वाव मिळाला, असेही ते म्हणाले.

मुकेश छाब्रा यांच्या वक्तव्यावर  सहमती व्यक्त करताना  क्षितिज मेहता म्हणाले की ओटीटी मंचाने  कास्टिंगची प्रक्रिया अधिक उत्कंठापूर्ण केली  आहे. जे कलाकार चित्रपटांमध्ये  लहानसहान  भूमिका साकारत होते ते आता वेबमालिका  आणि ओटीटी मंचांवरच्या कार्यक्रमांमध्ये  प्रमुख भूमिका साकारताना दिसतात, असे त्यांनी सांगितले.  शिवाय ओटीटी मंचावर दबाव तुलनेने कमी असतो   त्यामुळे कास्टिंग करणे सोपे झाले आहे आणि प्रक्रिया अधिक खुली झाली आहे, असे मेहता यांनी सांगितले. 

अभिनेत्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची आवश्यकता आणि महत्त्व विशद करताना, मुकेश छाब्रा यांनी या कार्यशाळा चित्रपटाचे स्थान  लक्षात घेऊन आयोजित केल्या जातात आणि नवीन कलाकारांवरील ताण कमी करून त्यांना  भूमिकेसाठी सज्ज करण्यात महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.  कलाकारांना घडवण्यात  आणि त्यांची प्रतिभा फुलवण्यात त्या  मदत करतात. कार्यशाळा घेण्याबाबत आपले मत मांडताना, क्षितिज मेहता म्हणाले की जर एखाद्याला  या प्रक्रियेतून न जाता यश मिळाले असेल  तर त्याला  कदाचित  गरज भासणार नाही परंतु त्यांनी कार्यशाळा केल्या तर  त्यांना फरक जाणवेल. हा फरक दीर्घकाळासाठी असेल. 

सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा कास्टिंग प्रक्रियेवर काही परिणाम होतो का या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश छाब्रा म्हणाले की, सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचा आणि कलाकार म्हणून निवड  होण्याचा काहीही  संबंध नाही. भूमिकेसाठी सर्वांना ऑडिशन (चाचणी )द्यावी  लागते. तुम्हाला अभिनय करायचा असेल तर शिका आणि प्रशिक्षण घ्या, प्रक्रियेचे अनुसरण करा,  100 टक्के प्रयत्न करा,असा सल्ला  मुकेश यांनी दिला. क्षितीज मेहता यांनी या विषयावर मुकेश छाब्रा यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

मुकेश छाब्रा  आणि क्षितिज मेहता यांनीही भारतीय चित्रपट उद्योगातील घराणेशाहीच्या मुद्द्यावर आपली  मते मांडली. याच विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की जे प्रतिभावान आहेत, जसे की,   राज कुमार राव, आयुष्मान, फातिमा शेख, रसिका दुग्गल, सान्या मल्होत्रा, मृणाल ठाकूर यांना संधी मिळत आहेत आणि ते चित्रपटसृष्टीत चांगली कामगिरी करत आहेत.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878963) Visitor Counter : 186


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil