माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मराठी नॉन-फिचरफिल्म 'रेखा' रस्त्यावर राहणाऱ्यांच्या स्वच्छतेच्या समस्यांवर प्रकाश टाकते आणि त्यांच्याप्रती असलेल्या समाजाच्या मलीन वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2022
53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) भारतीय पॅनोरमातील नॉन-फीचर विभागांतर्गत गुरुवारी, रस्त्यावर राहणाऱ्यांचा दैनंदिन संघर्ष, त्यांचे आरोग्य व स्वच्छताविषयक समस्या आणि समाजाचा त्यांच्याप्रती असलेला दृष्टिकोन यावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. 'रेखा' या मराठी नॉन-फिचर चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी या चित्रपटाविषयी सांगितले. “रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी आपले दरवाजे बंद असतात. पण आपण हे का करतो? त्यांच्या दुर्दशेमागील कारण आणि रस्त्यावरील रहिवाशांची समाजाकडून होणारी अवहेलना, या प्रश्नांमुळे मी या प्रकल्पावर दीड वर्ष संशोधन केले.” रस्त्यावर राहणाऱ्या महिलांच्या जीवनातील अडचणी मांडतानाच हा चित्रपट त्यांच्या मासिक पाळी आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो. “या विषयावर संशोधन करत असताना, त्यांची प्रत्यक्ष स्थिती जाणून मला धक्का बसला. त्यांना अनेक महिने आंघोळ करायला मिळत नाही”, रणखांबे सांगत होते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/rekha-19WSA.jpg)
नायिका रेखा रस्त्याच्या कडेला राहते. त्वचेच्या बुरशीजन्य संसर्गाने ती ग्रस्त असते. डॉक्टर तिला आंघोळ करून औषध लावायला सांगतात. पण तिचा नवरा तिला अडवतो आणि तिच्याशी दुर्व्यवहार करतो. रेखा आंघोळ करण्यासाठी प्रयत्न करते पण जेव्हा तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे कारण सांगतात तेव्हा तिला धक्काच बसतो. तिची द्विधा मनस्थिती होते. ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते जेणेकरून तिला संसर्गावर उपचार करण्यासाठी आंघोळ करता येईल. स्वच्छ राहण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचे चित्रण या फिल्ममध्ये आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/rekha-2FRX2.jpg)
या माहितीपटातील कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील वग कलाकारांचा समावेश असून ते यापूर्वी कधीही कॅमेऱ्याला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे त्यांना कॅमेऱ्यांसमोरच्या अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची कार्यशाळा घेण्यात आली. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये संहितालेखन आणि चित्रीकरण झाले. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगलीचे रहिवासी आहेत. पत्र सूचना कार्यालयाने आज आयोजित केलेल्या इफ्फी "टेबल-टॉक्स" सत्रात बोलताना त्यांनी प्रख्यात मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी या प्रकल्पात केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/rekha-3AMGK.jpg)
हा चित्रपट स्वच्छतेच्या संकल्पनेच्या विविध स्तरांवर लक्ष केंद्रित करतो, तसेच समाजाने रस्त्यावर राहणाऱ्यांबाबत दृष्टिकोन बदलण्याची गरजही व्यक्त करतो. आपल्या समाजातील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. "उच्चभ्रू समाजातील तसेच झोपडपट्टीतील महिलांना सारख्याच मानसिकतेचा सामना करावा लागतो", असे मत रणखांबे यांनी व्यक्त केले.
चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या माया पवार आणि तमिना पवार यांनी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाल्याबद्दल आणि इफ्फीमध्ये सहभागाची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तमाशा कलाकार असले तरी सिनेमाच्या माध्यमाने अधिक ओळख मिळवून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878937)
Visitor Counter : 260