मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यामध्ये प्रादेशिक आढावा बैठक

Posted On: 24 NOV 2022 8:12PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्हेंबर 2022

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यामध्ये प्रादेशिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील राज्यांच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीबाबत यावेळी चर्चा केली.

पशुधन क्षेत्राने 2014-15 ते 2020-21 या कालावधीत (स्थिर किमतींवर) 7.93% च्या उच्च चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) सातत्याने वृद्धी नोंदवली आहे. त्याशिवाय, पशुधन क्षेत्राने 2020-21 या वर्षात एकूण कृषी आणि संलग्न क्षेत्र जीव्हीए (स्थिर किमतीवर) मध्ये सुमारे 30% योगदान दिले आहे, असे सिंह यांनी अधोरेखित केले.

या बैठकीत, केंद्रीय सचिवांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारत सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या सर्व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय योजनांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी खर्च न केलेला निधी  उपयोगात  आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. केंद्रीय सचिवांनी सिंगल नोडल खाते, केंद्रीय नोडल एजन्सी खाती उघडणे, त्यांचे पीएफएमएससह मॅपिंग, न खर्च केलेल्या शिलकीवरील व्याज इत्यादींशी संबंधित समस्यांच्या तात्काळ निराकारणावर भर दिला, ज्याद्वारे भारत सरकारला चालू वर्षात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निधी जारी करता येईल. त्यांनी देशभरातील एफएमडी आणि ब्रुसेला विरूद्ध लसीकरणाची स्थिती, मोबाईल पशुवैद्यकीय केंद्रे (एमव्हीयू) कार्यान्वित करणे, दुधाची स्थिती, चारा तूट आणि त्याच्या किंमती इत्यादींचा आढावा घेतला. 

आरोग्य सेवेच्या तरतुदीद्वारे पशुधनाचे जतन  आणि संरक्षण यावर विभागाचा मोठा भर असल्याचे सिंह यांनी नमूद केले. देशात अलीकडेच पशुधनामधील लम्पी हा त्वचा रोग  आणि इतर गंभीर स्वरूपाच्या रोगांचा प्रसार झाला आहे. अशाप्रकारे, देशातील प्राण्यांच्या आजारांवर नियंत्रण आणि निर्मूलनासाठी, विभागाने डिसेंबर, 2022 पर्यंत एफएमडी  आणि फेब्रुवारी, 2023 पर्यंत लम्पी त्वचा रोगाविरूद्ध लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पशुधन आणि दुग्धोत्पादक शेतकर्‍यांपर्यंत योजनेचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी, केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्ह्यातील  अधिकारी यांच्या सक्रिय सहभागाने राज्यांमध्ये जनजागृती मोहिमा आयोजित करण्यावर देखील त्यांनी भर दिला.

 

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 1878652) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi