माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय पॅनोरमा (फिचर फिल्म्स)साठीच्या परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद
53 व्या इफ्फीमध्ये सादर करण्यासाठी भारतीय पॅनोरमातील 25 चित्रपटांची निवड
हे चित्रपट भारतीय चित्रपटांतील वैविध्य आणि अभिजातता यांचे दर्शन घडवितात
इफ्फीच्या इतिहासात प्रथमच, यावर्षी इरुला भाषेतील चित्रपट सादर करण्यात येणार
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
53 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर करण्यासाठी प्रस्तावित 400 चित्रपटांमधून मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह एकूण 25 फिचर फिल्म प्रकारातील चित्रपटांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय पॅनोरमा (फिचर फिल्म्स)साठीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी दिली.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/jury-16MUR.jpg)
गोवा येथे आज झालेल्या ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गणात्रा म्हणाले की, हे सर्व चित्रपट अत्यंत लोकशाहीवादी आणि पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून निवडण्यात आले आहेत. “परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी महिन्याभरात भारतीय सिनेमासृष्टीतील वैविध्य, सौंदर्य आणि अभिजातता यांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 400 चित्रपट पाहिले. प्रत्येक चित्रपट तयार करणाऱ्या व्यक्तीची बुध्दी आणि हृदय अशा दोन्हींचा विचार करून आम्ही न्यायी पद्धतीने चित्रपटांची निवड केली.
“सर्व प्रकारचे अडथळे आणि भेदभाव मागे सारत, चित्रपट स्वतःच्या भाषेत व्यक्त होत असतो. परीक्षक मंडळातील सर्व सदस्यांचे दृष्टीकोन आणि निवाडा यांच्या आधारावर आम्ही चित्रपटांची निवड केली आहे आणि निवड प्रक्रीयेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,” असे परीक्षक मंडळ सदस्य आणि तेलुगु चित्रपटांचे दिग्दर्शक व्ही.एन.आदित्य यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/jury-206SQ.jpg)
मंडळातील आणखी एक सदस्य अशोक कश्यप म्हणाले की, चित्रपटांची निवड करताना भारताची वैशिष्ट्ये आणि आपली भाषा, संस्कृती, कला तसेच वारसा यामधील विविधता सर्वांसमोर सादर करणे हा उद्देश ठेवण्यात आला. “हे चित्रपट इफ्फीमध्ये भारताच्या लघु प्रतिकृतीचे दर्शन घडवतील. यावर्षी इतर भाषांतील चित्रपटांसह, इरुला या केरळमधील आदिवासी समाजाच्या भाषेतील चित्रपटाची देखील इफ्फीतील सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.
आणखी एक परीक्षक विष्णू शर्मा म्हणाले की, हे चित्रपट पाहणे आणि त्यांचे परीक्षण करणे हा या परीक्षक मंडळातील सर्व सदस्यांसाठी ज्ञान वाढविणारा एक व्यक्तिगत तसेच सामूहिक अनुभव होता.
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, संकलक आणि 9 राष्ट्रीय तसेच 36 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे विनोद गणात्रा यांनी 13 सदस्यांच्या या परीक्षक मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. या मंडळात खालील सदस्यांचा समावेश होता. यांच्यापैकी प्रत्येकाचे मान्यताप्राप्त चित्रपट, चित्रपटाशी संबंधित संस्था आणि व्यवसाय यांतील व्यक्तिगत योगदान फार मोठे आहे. हे सर्व परीक्षक सामुहिक पातळीवर समृध्द आणि वैविध्यपूर्ण भारतीय चित्रपट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात.
- विनोद गणात्रा (अध्यक्ष)
- ए. कार्तिकराजा
- डॉ. अनुराधा सिंग
- आनंद ज्योती,
- अशोक कश्यप
- ईन्युमुला प्रेमराज
- एम.गीता गुरप्पा
- जुगल दिबेटा
- शैलेश दवे
- शिबू जी. सुसेलान
- विष्णू शर्मा
- व्ही एन आदित्य
- इमो सिंह
इफ्फीमधील सादरीकरणासाठी मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह एकूण 25 फिचर फिल्म प्रकारातील चित्रपटांची निवड करण्यात आली. सुमारे 400 समकालीन भारतीय चित्रपटांच्या विस्तृत यादीतून निवडण्यात आलेले हे चित्रपट भारतीय सिनेमा उद्योगाची ऊर्जा आणि विविधता यांचे दर्शन घडवितात.
या कार्यक्रमातील संपूर्ण चर्चा पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा :
* * *
PIB Mumbai | U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878203)
Visitor Counter : 223