माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अॅनिमेशनपट बनवताना भावनिक कथाकथनावर सर्वाधिक जोर देण्याचा कायमचा कल असल्याचे विख्यात अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अॅनिमेटर मार्क ओसबोर्न यांचे इफ्फी महोत्सवातील विशेष सत्रात प्रतिपादन


‘अॅनिमेशनपटांना स्क्रिप्टमध्ये बांधून ठेवता येत नाही कारण ते सतत बदलत असते.’

Posted On: 22 NOV 2022 6:25PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅनिमेशनपटांसाठी वरदान असले तरी अॅनिमेशन चित्रपटांची निर्मिती करताना सर्वाधिक कल हा भावनिक कथाकथनावर  असतो, असे अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अॅनिमेटर मार्क ओसबोर्न यांनी सांगितले. ते कुंग फू पांडा आणि द लिटल प्रिन्स यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘अ‍ॅनिमेशन अॅज ए टूल फॉर एक्सप्रेशन’ या विषयावरील विशेष सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

“ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे, जागतिक पातळीवरच्या प्रेक्षकांसाठी विषय तयार करणे हे नित्याचे होणार आहे. सरते शेवटी चित्रपट लोकांशी जोडला जाणे आणि त्याने हृदयाला स्पर्श करणे आवश्यक आहे'', असेही ते म्हणाले. अशा प्रकारचे विषय पडद्यावर आणताना आपल्यासाठी काय अर्थपूर्ण आहे हे शोधणे खरोखर महत्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “जर ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल आणि तुम्ही त्याबद्दल प्रामाणिक असाल तर तुम्हाला तुमचे प्रेक्षक सापडतील. प्रामाणिकपणा एक नवीन दृष्टीकोन तयार करतो,” असेही त्यांनी नमूद केले.

अॅनिमेशनच्या सामर्थ्यावर भर देताना मार्क म्हणाले की कोणतीही कथा सांगू शकणारे अॅनिमेशन हे एक वैविध्यपूर्ण आणि व्यापक माध्यम आहे. “अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची कोणाला तरी जाणीव करून देणं हे खरंच खूप छान आहे. पुनर्लेखन, पुनर्बांधणी आणि प्रयोगांच्या निरंतर प्रक्रियेचा हा परिणाम आहे. मग अ‍ॅनिमेशनची जादू जीवनात येते.”, असे विश्लेषण त्यांनी केले.

स्क्रिप्ट स्वरूपात अॅनिमेशन प्रकल्पाला अंतिम रूप देता येत नाही, असेही मत मार्क ऑस्बोर्न यांनी मांडले. “अॅनिमेशनपट बनवताना स्क्रिप्ट लॉक करता येत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सुधारणेला नेहमीच वाव असतो. ॲनिमेशन विकसित होणार आहे आणि बदलणार आहे. व्हिज्युअल माध्यम असल्याने प्रकल्पावर बरेच काम करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक अॅनिमेटरला कथा बाहेर आणण्यासाठी मदतीची आवश्यकता असते, असे त्यांनी सांगितले. “कलाकार आणि निर्मात्यांना पाठिंबा दिल्याने चमत्कार घडण्यास मदत होऊ शकते. कलाकारांना अॅनिमेशन तयार करण्यासाठी स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे”, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दिग्गजांकडून प्रेरणा घेणे महत्त्वाचे असले तरी त्यांच्या कामाचे अनुकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना मार्क यांनी केली. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कल्पनांचा शोध घेऊन समतोल राखावा लागेल. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन आणि जीवनाचा अनुभव वेगळा असतो, . हा वैयक्तिक प्रवास आणि अनुभव चित्रपटसृष्टीत आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

अँटोइन डी सेंट-एक्सपेरी यांनी लिहिलेल्या कादंबरीचे रूपांतर करून द लिटल प्रिन्स हा चित्रपट तयार करण्याच्या आपल्या प्रवासाचे तपशीलवार सादरीकरणही मार्क ऑस्बोर्नने केले. सत्राचे सूत्रसंचालन प्रोसेनजीत गांगुली यांनी केले.

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटी आय), नॅशनल फिल्मस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि इएसजी द्वारे विशेष सत्रांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांना चित्रपट सृष्टीच्या प्रत्येक पैलूत प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी एकूण 23 सत्रे आयोजित केली जात आहेत.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878061) Visitor Counter : 165