संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांनी सिएम रीप येथे आगमनानंतर कंबोडियाचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक आयोजित केली


द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी परस्परांना फायदेशीर मार्गांवर चर्चा केली

Posted On: 21 NOV 2022 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 21 नोव्हेंबर 2022 रोजी, भारत-आसियान संरक्षण मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्ष पद भूषविण्यासाठी आणि 9 व्या आसियान संरक्षण मंत्री बैठक प्लस (एडीएमएम प्लस) मध्ये सहभागी होण्यासाठी, कंबोडियातील सिएम रीप येथे पोहोचले. आपल्या आगमनानंतर राजनाथ सिंह यांनी कंबोडियाचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल टीईए बान्ह यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांची स्नेहपूर्वक भेट घेतली आणि भारत आणि कंबोडिया दरम्यानच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांची नोंद घेऊन त्याबाबतच्या विचारांचं आदान-प्रदान केलं.           

या भेटीदरम्यान, कंबोडियातील प्राचीन मंदिर संकुल अंगकोर वाट हे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंधांचे प्रतीक आहे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. या वर्षी दोन्ही देश परस्परांबरोबरच्या राजनैतिक संबंधांची 70 वर्षे पूर्ण करत आहेत हे विशेष आहे.

कंबोडियाने 2022 मध्ये आसियान (ASEAN) आणि एडीएमएम प्लस (ADMM Plus) चे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी अभिनंदन केले. राजनाथ सिंह आणि जनरल टीईए बान्ह यांनी दोन्ही देशां दरम्यानच्या संरक्षण सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्यासाठी परस्परांसाठी फायदेशीर मार्गांवर चर्चा केली.

भारत-आसियान संबंधांच्या 30 वर्षांनिमित्त, भारत आणि कंबोडिया 22 नोव्हेंबर 2022 रोजी राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भारत-आसियान संरक्षण मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीत भारत-आसियान भागीदारीला चालना देण्यासाठीच्या विविध उपक्रमांची घोषणा केली जाईल.

23 नोव्हेंबर 2022 रोजी, कंबोडिया, एडीएमएम प्लस बैठकीचे अध्यक्ष म्हणून, 9व्या वार्षिक बैठकीचे आयोजन करेल आणि संरक्षण मंत्री, या मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्यात संरक्षण मंत्री कंबोडियाच्या पंतप्रधानांची भेट देखील घेतील.

 

 

 

 

S.Tupe/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1877914) Visitor Counter : 106


Read this release in: English , Urdu , Hindi