माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मी कथा लिहित नाही, मी त्या नकळतपणे उचलतो: 53व्या इफ्फीतील मास्टरक्लासमध्ये व्ही.विजयेंद्र प्रसाद यांचे प्रतिपादन


जी व्यक्ती चांगल्या प्रकारे खोटे बोलू शकते तीच उत्तम कथाकथनकार होऊ शकते

प्रेक्षकांमध्ये चांगल्या कथेची ‘भूक’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यातून तुमच्यातील सर्जकतेला चालना मिळते

Posted On: 21 NOV 2022 9:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

मी चित्रपटाच्या कथा लिहित नाही, मी त्या इतरांच्या नकळत उचलतो. कथा तुमच्या आजूबाजूस असतातच, मग ती रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये असोत किंवा प्रत्यक्ष जीवनातील घटना असो, तुमच्या सभोवती कथा घडत असतात. तुम्ही त्या कथा तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून सादर करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजान आणि मगधीरा यांसारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहिणारे प्रख्यात पटकथाकार व्ही.विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे.  

“प्रेक्षकांमध्ये तुमच्या कथेची भूक निर्माण करण्यामुळे तुमच्यातील सर्जकतेला चालना मिळत राहते.  मी माझी कथा  आणि त्यातील पात्रे यांसाठी माझ्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मला आणखी अनोखे आणि आकर्षक काम करण्याची प्रेरणा देते,” तज्ञ कथाकथनकार म्हणाले. 

गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीनिमित्त ‘तज्ञ व्यक्तींची कथा लेखन प्रक्रिया’ या संकल्पनेवर आधारित मास्टरक्लासमध्ये चित्रपट क्षेत्राविषयी उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांना संबोधित करताना व्ही.विजयेंद्र प्रसाद बोलत होते.

पटकथा लेखनाच्या स्वतःच्या शैलीविषयी बोलताना प्रसाद म्हणाले की ते त्यांच्या कथेत मध्यंतराच्या सुमारास एखादे अनपेक्षित वळण आणण्याचा विचार करतात आणि त्यानुसार कथेची रचना करतात. “तुम्हाला शून्यातून कथा निर्माण करावी लागते. तुम्हांला खऱ्यासारखे दिसणारे खोटे जग निर्माण करावे लागते. जी व्यक्ती चांगल्या प्रकारे खोटे बोलू शकते तीच उत्तम कथाकथनकार होऊ शकते,” ते पुढे म्हणाले.

या मास्टरक्लासमधील एका उदयोन्मुख कथा लेखकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कुशल कथाकार प्रसाद म्हणाले की, आपण आपल्या मनाची कवाडे सताड उघडी ठेवली पाहिजेत आणि आजूबाजूच्या प्रत्येक घडामोडीची नोंद घेतली पाहिजे. “तुम्ही स्वतः तुमचे सर्वात कठोर समीक्षक असणे गरजेचे आहे. मगच तुमच्यातील सर्वोत्तम कलेचा आविष्कार होतो आणि तुम्ही तुमचे काम अमर्याद उंचीवर नेऊन ठेवू शकता,” ते ठामपणे म्हणाले.

बाहुबली तसेच आरआरआर सारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहितानाचा अनुभव सर्वांना सांगताना ते म्हणाले, “मी कथा लिहित नाही, मी त्या सांगतो. कथेचा ओघ, त्यातील विविध पात्रे, कथेत येणारी वळणे, सगळे काही माझ्या डोक्यात असते.” ते म्हणाले की एका उत्तम लेखकाला दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख पात्रे आणि प्रेक्षक अशा सर्वांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात.  

मास्टरक्लास मधील या सत्राचे सूत्र संचालन चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877843) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu