माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पत्रसूचना कार्यालयातील इफ्फी युनिटने #NotJustIFFIMemeContest नामक मीम अर्थात विनोदी चित्रमय लघु संदेश तयार करण्याबाबतची स्पर्धा आयोजित केली
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
या स्पर्धेचा एकच नियम असणार आहे: एक उत्तम मीम म्हणजे विनोदी चित्रमय लघु संदेश अथवा अशा मीम्सची मालिका सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करा, या मीमने लोकांना हसायला, आनंदाने उड्या मारायला, उडायला,एकमेकांना मिठ्या मारायला, आपापले त्रास विसरुन जायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना चित्रपटांच्या आणि जीवनाच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला लावले पाहिजे.
पुन्हा एकदा समजून घ्या, या मीम्सनी लोकांना चित्रपटांकडे आकर्षित केले पाहिजे, आणि पुनश्च आनंदी जीवन जगण्याच्या देखील प्रेमात पाडले पाहिजे.
तुमचे मीम्स समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करा. नुसता #NotJustIFFIMemes हा हॅशटग वापरून चालणार नाही. म्हणजे, तो हॅशटॅग वापरा पण तो वापरून तुमचे उत्तमोत्तम आणि प्रेरणादायी मीम्स सर्वांशी सामायिक करा. आणि सगळेच मीम्स उत्तम असले पाहिजेत असेही नाही. प्रयोगशीलता ही सर्जकतेची गुरुकिल्ली आहे. आपलं हसं करून घ्यायला घाबरू नका. (आम्ही तुम्हाला हसणार नाही, तर आम्ही तुमच्यासोबत हसू, कोणी आपल्याकडे पाहून हसणार असेल तर हसू द्या!)
या स्पर्धेसाठी कोणतीही कालमर्यादा नाही. आम्हाला पारितोषिकासाठी पात्र ठरतील अशा प्रेरणादायक वाटणाऱ्या मीम्सच्या निर्मात्यांना आम्ही पारितोषिके देऊ.आम्ही त्यांना केवळ कृतज्ञतेची भेट देणार नाही तर आमची प्रशंसा आणि पारितोषिक देखील देऊन त्यांचा सन्मान करू.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी विजेत्यांची संख्या ठराविक नाही. आमच्याकडे आलेल्या मीम्सपैकी ज्या कलाकृती आम्हाला पारितोषिकासाठी पात्र वाटतील त्या सर्वांचा आम्ही गौरव करू.
बरं, या स्पर्धेच्या विजेत्यांना कोणती बक्षिसे मिळतील? आम्ही विजेत्यांना अशी बक्षिसे देणार आहोत जी तुम्हांला चित्रपटांच्या आणि जीवनाच्या प्रेमात पडायला लावतील किंवा असे म्हणूया की या बक्षिसांमुळे चित्रपटांवरील आणि एकूणच जीवनावरील तुमच्या प्रेमाची पातळी वाढेल.
मग, वाट कसली पाहताय... विचार करायला सुरुवात करा! तुम्ही तयार केलेली मीम्स पाहण्यासाठी आता आम्हाला धीर धरवत नाही. चला, काम सुरु करा, आत्ताच मीम्स करायला घ्या.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877830)
Visitor Counter : 212