माहिती आणि प्रसारण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        दक्षिण आशियातील सर्वात मोठी चित्रपट बाजारपेठ - फिल्म बझारचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
                    
                    
                        
                    
                
                
                
                
                
                
                
                गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
 
फिल्म बझारच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, "भारत हा जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्या देशांपैकी एक आहे आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते या महोत्सवात सहभागी होऊन भारतीय चित्रपट निर्मात्यांशी सहकार्य करार करतात. यासाठी इफ्फी हा अतिशय योग्य मंच आहे. भारत ही चित्रपट उद्योगाची एक मोठी बाजारपेठ बनली आहे."

(कॅप्शन - आज गोवा इथे फिल्म बझारच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर)
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "इफ्फीमध्ये चित्रपटांसाठी सहनिर्माते आणि सहकारी शोधण्याच्या विपुल संधी आहेत. चित्रपट निर्मिती आणि विक्रीची मोठी बाजारपेठ बनण्याचे आमचे ध्येय आहे". 
त्यांनी यंदाच्या इफ्फीमध्ये बदल घडविण्यासाठी आणि नवीन उप्रकम सुरु करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सुकाणू समितीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. इफ्फी अधिक भव्य आणि उत्तम करण्यासाठी सूचना आणि कल्पना देण्याचे त्यांनी आवाहन केले. 

(कॅप्शन - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज गोव्यात फिल्म बझारचे उद्घाटन करताना) 
दक्षिण आशियातील सर्वात मोठी चित्रपट बाजारपेठ फिल्म बझारचे, आज गोव्यात केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 53व्या इफ्फीदरम्यान आयोजित या उपक्रमात दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांत सृजनशील आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जाते. माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, तसेच चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
फिल्म बझार: 
वर्ष 2007 मध्ये लहान प्रमाणात सुरवात केल्यानंतर, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या संकल्पनेतून आयोजित फिल्म बझार हा दक्षिण आशियातील जागतिक चित्रपट बाजारपेठ म्हणून विकासीत झाला आहे. यात दर वर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचा सहभाग वाढतच आहे. गेल्या काही वर्षांत लंच बॉक्स, मार्गारीटा विथ अ स्ट्रो, चौनौती कूट, किस्सा, शिप ऑफ थीसस, तितली, कोर्ट, अन्हे घोडे दा दान, मिस लव्हली, दम लगाके हैशा, लायर्स डाइस आणि थिथी या चित्रपटांवर एक किंवा अधिक कार्यक्रम फिल्म बझारमध्ये झाले आहेत. 
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात फिल्म बझार जगभरातील चित्रपट ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी आकर्षण बनतो. चित्रपट, वितरण आणि निर्मिती मधील दक्षिण आशियातील कंटेंट आणि कौशल्य शोधून त्याला मदत करण्यावर फिल्म बझारचा भर असतो. जागतिक सिनेमाची दक्षिण आशियाई क्षेत्रात विक्री करण्यात देखील फिल्म बझारची महत्वाची भूमिका असते. 
 
 
 
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                (Release ID: 1877773)
                Visitor Counter : 296