माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 53 व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागाचे केले उद्घाटन


चित्रपटबाह्य विभागात "द शो मस्ट गो ऑन" हा शुभारंभाचा चित्रपट वृद्धत्वाकडे झुकलेल्या पण तरीही तग धरून राहणाऱ्या पारशी रंगभूमीचा इतिहास मांडतो,

शहरी भागातील किशोरवयीनांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या हा संवदेनशील विषय मांडणाऱ्या "हदीनेलन्तु" चित्रपटाने 53 व्या इफ्फीची सुरुवात

Posted On: 21 NOV 2022 6:25PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

गोव्यात होत असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इंडियन पॅनोरमा विभाग, संपूर्ण भारतीय भूभागावरील कथा मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याच्या वचनासह आज सुरू झाला.

इफ्फीच्या भारतीय पॅनोरमा 2022 श्रेणी अंतर्गत अधिकृत विभागात 25 कथापट आणि 20 कथेतर चित्रपट  यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  

इफ्फीत सादर होणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले. सर्व चित्रपट पाहून त्यातील सर्वोत्तम चित्रपटांची भारतीय पॅनोरमा विभागासाठी निवड केल्याबद्दल परीक्षकांचे (ज्युरींचे) त्यांनी आभार मानले.

"भारतीय पॅनोरमा विभागांतर्गत, आम्ही देशाच्या चारही कोपऱ्यांमधून निवडलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करणार आहोत" असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यावेळी म्हणाले. 

हदिनेलेन्तु (चित्रपट) आणि द शो मस्ट गो ऑन (चित्रपटबाह्य) या शुभारंभाच्या चित्रपटांच्या निर्मात्यांचा केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सत्कार केला.

द शो मस्ट गो ऑन च्या दिग्दर्शक दिव्या कावसजी यांचा अनुराग ठाकूर यांनी सन्मान केला.


हदीनेलन्तुचे  दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांचा अनुराग ठाकूर यांनी सत्कार केला.

चित्रपटबाह्य विभागातील शुभारंभाचा चित्रपट, द शो मस्ट गो ऑन या  चित्रपटाच्या दिग्दर्शिका दिव्या कावसजी यांनी टिपणी केली की, “करोना बंदीच्या काळात मी आणि माझा चित्रपट निर्माता असलेला भाऊ घरीच अडकलो होतो. जुन्या पारशी नाट्य कलाकारांच्या तालमींचे चित्रिकरण संपादीत करण्याचा निर्णय आम्ही तेव्हा घेतला. पारशी नाटकांच्या त्या महान कलाकारांचे शेवटचे चित्रित सादरीकरण  संपादित करताना मी त्यांच्या प्रेमातच  पडले, मी अभिमानाने सांगू शकते की हा चित्रपट संपादन टेबलवर जन्माला आला आहे.

चित्रपट श्रेणीतील शुभारंभाचा चित्रपट हदीनेलन्तु असून दिग्दर्शकाचा हा चौथा चित्रपट आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बुसान 2022 मध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटाला मिळालेल्या सन्मान आणि मान्यतेबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांनी इफ्फीचे आभार मानले आहेत. हा चित्रपट आपल्या काळातील शहरी समाजातील किशोरवयीन मुलांना भेडसावणाऱ्या संवेदनशील समस्यांवर भाष्य करतो असे ते म्हणाले.

भारतीय पॅनोरमा हा या महोत्सवामधील महत्त्वाचा घटक असून या विभागाअंतर्गत चित्रपट कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समकालीन भारतीय चित्रपटांतील सर्वोत्तम चित्रपटांची निवड करण्यात येते. भारतीय चित्रपट तसेच भारतातील समृद्ध संस्कृती आणि चित्रपटीय कला यांना उत्तेजन देण्यासाठी 1978 पासून इफ्फीच्या छत्राखाली या विभागाची सुरुवात करण्यात आली.

आजच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी चित्रपटांचे परिक्षण करणाऱ्या ज्युरी सदस्यांचा देखील सत्कार केला.

भारतभरातील चित्रपट जगतात कार्यरत सुप्रसिद्ध व्यक्तींनी भारतीय पॅनोरमामध्ये सादर होणाऱ्या चित्रपटांची निवड केली आहे. यामध्ये फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 12 परीक्षक तर नॉन-फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 6 परीक्षकांनी संबंधित विभागीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चित्रपटांच्या निवडीचे काम केले.

फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 12 परीक्षकांच्या पथकाचे नेतृत्व मान्यवर दिग्दर्शक आणि संकलक अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी केले तर नॉन-फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 6 परीक्षकांनी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, निर्माते, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक विजेते ओईनाम डोरेन यांच्या नेतृत्वाखाली परीक्षणाचे काम केले.

चित्रपट निर्मिती कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय पॅनोरमासाठी निवड झालेले चित्रपट ना-नफा तत्वावरील सादरीकरणासाठी भारत आणि परदेशात होणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमाअंतर्गत भरणारे भारतीय चित्रपट सप्ताह आणि सांस्कृतिक विनिमय नियमांच्या कक्षेत न बसणारे विशेष भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सव यामध्ये देखील प्रदर्शित करण्यात येतील.

भारतीय पॅनोरमामध्ये सादर होणाऱ्या चित्रपटांची माहिती

हाडीनेलेंटू: इयत्ता बारावीत शिकणारे दीपा आणि हरी हे विद्यार्थी महाविद्यालयाचे तास संपल्यानंतर वर्गात व्यतीत केलेल्या त्यांच्यातील जवळीकीचे क्षण दीपाच्या फोनमध्ये रेकॉर्ड करतात.सोमवारी त्यांना त्यांच्या प्राचार्यांचे बोलावणे येते आणि त्यांचा व्हिडिओ आता इंटरनेटवर उपलब्ध असल्याची भीतीदायक माहिती त्यांना मिळते. त्या दोघांचे कुटुंबीय सैरभैर होतात. त्या दोघांना महाविद्यालयातून तात्पुरते निलंबित करून व्यवस्थापन त्यांच्यावरील पुढच्या कारवाईचा विचार सुरु करते.मात्र, जेव्हा त्या दोघांच्या जातीविषयीची माहिती समोर येते तेव्हा मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊ लागतात.

द शो मस्ट गो ऑन: अनेक दशके अज्ञातवासात काढल्यानंतर, पारशी रंगभूमीवरील वयोवृद्ध अभिनेते त्यांच्या अखेरच्या प्रयोगासाठी रंगभूमीवर येतात. अखेरच्या वेळी व्यासपीठ गाजवून सोडण्यासाठी तालमीत खोल बुडून जाताना या कलाकारांच्या लवचिकतेचा कस लागतो  याचे चित्रण या माहितीपटात  जिवंत केले आहे. तालमींच्या काळात होणारा सर्जनशील गोंधळ हा त्यांच्यातील बंधाचे, विशेष संवेदनशीलतेचे आणि फारसे सौम्य नसलेल्या अद्वितीय विनोदबुद्धीचे दर्शन घडवते. मात्र, अंतिम खेळाच्या पूर्वसंध्येला नाटकाच्या कलाकारांन मोठ्या दुःखद घटनेला सामोरे जावे लागते. यामुळे सर्व परिस्थिती बदलून जाईल का? की आधी ठरल्याप्रमाणे नाटकाचा खेळ सादर होईल?

* * *

PIB Mumbai | JPS/GC/Vinayak/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877762) Visitor Counter : 159