माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सुप्रसिद्ध स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक, कार्लोस सौरा यांचा 53 व्या इफ्फीमध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
हा सन्मान मिळाल्याबद्दल कार्लोस सौरा यांनी महोत्सव आयोजकांविषयी व्यक्त केली कृतज्ञता आणि स्नेह
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2022
गोव्यात आजपासून म्हणजे 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध स्पॅनिश दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कार्लोस सौरा यांना या सन्माननीय पुरस्काराने उद्घाटन समारंभात सन्मानित करण्यात आले. इफ्फी- 53 च्या उद्घाटन समारंभात त्यांची कन्या अॅना सौरा यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत, कार्लोस सौरा यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आयोजकांचे आभार मानले. सध्या आजारी असल्याने, आपण स्वतः हा पुरस्कार घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. या सन्मानासाठी निवड केल्याबद्दल महोत्सवाच्या आयोजकांप्रती त्यांनी अपार कृतज्ञता आणि स्नेह व्यक्त केला.
कार्लोस सौरा यांना हा पुसस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की सौरा यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्रपटकलेला वाहिले आहे. सौरा, जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते आणि सिनेमटोग्राफर्सपैकी एक असल्याचे गौरवोद्गार ठाकूर यांनी काढले.
५३ व्या इफ्फीमध्ये रेट्रोस्पेकटीव्ह विभागात, कार्लोस सौरा यांचे काही निवडक पुरस्कार विजेते चित्रपट दाखवले जाणार आहेत.
कार्लोस सौरा, हे स्पेनमधील सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. अर्धशतकाहून अधिक प्रदीर्घ आणि विपुल अशी त्यांची कारकीर्द आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डेप्रिसा डेप्रिसा’चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी त्यांना गोल्डन बेअर, ‘ला काझा’ आणि ‘पेपरमिंट फ्रॅपे’साठी दोन सिल्व्हर बेअर, ‘कारमेन’साठी बाफ्टा आणि कानमधील तीन पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सुमारे अर्धशतकाची प्रदीर्घ आणि शानदार कारकीर्द असलेल्या, सौरा यांच्या चित्रपटात, वास्तविकता आणि कल्पनारम्यता, भूतकाळ आणि वर्तमान, तसेच स्मृति आणि भ्रम यांचा उत्तम संयोग घडवून, त्यातून प्रभावी कथावस्तू उभी राहते. कझीन अँजेलिका, मामा कम्पल 100 अॅनोस, फ्लेमेन्को ट्रायलॉजी ब्लड वेडिंग, कारमेन आणि लव्ह द मॅजिशियन या त्यांच्या काही नावाजलेल्या कलाकृती आहेत.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877589)
Visitor Counter : 295