माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

53व्या इफ्फी महोत्सवात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि चित्रपट’ या विषयावरील मल्टीमिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन होणार


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीबीसीतर्फे भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती सामान्य जनतेला देण्यात येणार

गोवा/मुंबई, 20 नोव्‍हेंबर 2022

"कदम कदम बढाये जा...."

तुम्हाला आझाद हिंद सेनेच्या फौजेसोबत संचलनात भाग घ्यायचा  असेल, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वैभवशाली दिवसांच्या स्मृतींना उजाळा द्यायचा असेल आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि चित्रपट’ या विषयावरील परस्पर संवादात्मक अल्ट्रा-डिजिटल प्रदर्शनाला भेट द्यावी लागेल. वास्तवाधारित वाढीव आभासी अनुभव देणाऱ्या या प्रदर्शनात तुम्हांला आझाद हिंद सेनेसोबत आभासी संचलन करता येईल.

53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्या या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीबीसी अर्थात केंद्रीय संपर्क मंडळातर्फे, गोव्यात पणजी येथे 21 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.    

या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्मिळ चित्रण सादर करण्यात येणार असून सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती करून देणे आणि तरुण पिढीला त्या विषयी प्रेरित करणे हा या प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेकानेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यावर आधारित फ्लिप बुक, पॅनेल आणि त्यांच्यावर आधारित चित्रपटांच्या माध्यमातून या प्रदर्शनात स्वातंत्र्य चळवळीचा प्रवास कालक्रमानुसार  सादर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रोत्साहनपर भाषणांच्या संग्रहित रेकॉर्डिंग तसेच या चळवळीचा आवाज झालेली महत्त्वाची समरगीते आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वर्णन करणारे संस्मरणीय संवाद यांचा देखील या प्रदर्शनात समावेश आहे. त्याचप्रमाणे, 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण वर्तुळाकार अनुभव देणारे एक इम्मर्सिव्ह प्रकारचे नाट्यदालन देखील उभारण्यात आले आहे.

तसेच, तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनात, परमवीर चक्र विजेत्या थोर व्यक्तिमत्वांचे वर्णन करणारा चित्रपट देखील या प्रदर्शनात सादर होईल. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या चित्रपटांची माहिती सांगणारे विविध फलक देखील येथे लावण्यात येतील. या प्रदर्शनात जालियानवाला बाग घटनेची साद्यंत माहिती देणारा स्वतंत्र सर्जनशील फलक देखील लावण्यात येणार आहे. तसेच येथे ‘आझादी क्वेस्ट’ खेळाचा एक स्वतंत्र विभाग असेल आणि तेथे भेट  देणाऱ्यांना त्या विभागातील खेळ खेळून स्वातंत्र्य चळवळीविषयी असलेले ज्ञान समृद्ध करता येईल. या प्रदर्शनात, डिस्कव्हरी वाहिनीने निर्मिलेल्या भारताच्या प्रवासावर आधारित ‘जर्नी ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे, नेटफ्लिक्स या ओटीटी मंचावरील अॅनिमेशन मालिकेचे तसेच दूरदर्शनने नुकत्याच तयार केलेल्या ‘स्वराज’या मालिकेचे देखील सादरीकरण करण्यात येईल.    

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1877544) Visitor Counter : 283


Read this release in: Tamil , Odia , English , Urdu , Hindi