माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर गोव्यामधल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाला उपस्थित राहणार
गोवा/मुंबई, 19 नोव्हेंबर 2022
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि इफ्फी 53 मधल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2022 हे दोन दिवस गोवा दौऱ्यावर असतील.
20 नोव्हेंबर रोजी इफ्फी 53 च्या उद्घाटन सत्रात प्रदर्शित होणार्या, ऑस्ट्रियाचे दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा एंड ऑस्कर या चित्रपटाच्या रेड कार्पेट समारंभाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये इफ्फी 53 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. यावेळी ते ‘भारतीय चित्रपट कर्मी 2022’ च्या विजेत्याची घोषणा करतील आणि इफ्फी 53 च्या उद्घाटनप्रसंगी स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करतील.
आपल्या दौऱ्याच्या दुसर्या दिवशी, ते इफ्फी 53 च्या ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ विभागाच्या 2ऱ्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. यावेळी ते भारतातल्या चित्रपट क्षेत्रातील 75 तरुण आशादायी प्रतिभावंतांशी संवाद साधतील. त्यानंतर ठाकूर इफ्फी 53 च्या फिल्म बाजार पॅव्हेलियनच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर, ते भारतीय पॅनोरमा विभाग आणि चित्रपट महोत्सवाच्या कंट्री फोकस (फ्रान्स) विभागाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. आपल्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात,अनुराग सिंह ठाकूर पणजीमध्ये फुटबॉल मैदानात एफटीआयआयने आयोजित केलेल्या चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करतील. या ठिकाणी तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/सिनेमा आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित विविध घटक प्रदर्शित केले जातील.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877390)
Visitor Counter : 193