विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आरोग्य सेवा देणारा जगातील सर्वात किफायतशीर केंद्रांपैकी एक बनला : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 17 NOV 2022 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा वापर करणाऱ्या जगातील,  सर्वात किफायतशीर आरोग्य सेवा केंद्रांपैकी एक बनला आहे.

  

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या आरोग्य सेवा नेतृत्व संमेलन -2022 ला मार्गदर्शन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, 2019 ते 2022 दरम्यान परदेशी लोकांसाठी 10 लाखांहून जास्त वैद्यकीय व्हीसा जारी करण्यात आले असून,  भारत, जगाचे वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून वेगाने उदयाला येत आहे. ते म्हणाले, हा आकडा लक्षणीय आहे, कारण महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासावर जवळजवळ पूर्ण बंदी होती.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, भारतामधील आरोग्य सेवा क्षेत्र 2025 सालापर्यंत 50अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर वैद्यकीय पर्यटनाचा एकूण जागतिक बाजार अंदाजे 72 अब्ज डॉलर्सचा आहे. ते म्हणाले, 2023 सालापर्यंत वैद्यकीय पर्यटनामधील भारताचा वाटा 10 अब्ज डॉलर्स इतका असेल. त्याशिवाय, देश जनऔषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार आहे.  

सरकारच्या सक्रीय प्रयत्नांच्या माध्यमातून भारतामध्ये संंलग्न आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे या संमेलनाच्या विषयाला धरून बोलताना मंत्र्यांनी यावर भर दिला की, सरकारचा हेतू आणि धोरणे सर्वांना  परवडणारी आरोग्यसेवा निर्माण करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत  आहेत.

ते म्हणाले, पंतप्रधानांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे, नवीन तंत्रज्ञानाच्या आणि नव-कल्पनांच्या मदतीने प्रश्न सोडवण्यासाठी देशातल्या तरुणांच्या कल्पना शक्तीला वाव मिळाला, आणि आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान, कृषी, विमान वाहतूक, शिक्षण, ऊर्जा, आरोग्य आणि अवकाश यासारख्या क्षेत्रांमधील स्टार्टअप्स वेगाने उदयाला येत आहेत. डॉ. जितेंद्र सिंह यांनी याकडे लक्ष वेधले की,  सध्या भारतामध्ये 4,000 पेक्षा जास्त आरोग्य सेवा स्टार्टअप्स आहेत. त्यांनी उपलब्ध केलेल्या व्यासपीठाच्या मदतीने  आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवायला मदत होते, एआय म्हणजेच कृत्रिम बु‍द्धिमत्तेच्या मदतीने रोग आणि आजाराचे निदान करता येते, रुग्णांना डॉक्टरांशी जोडता येते. एआयमुळे देशात आणखीही परिसंस्था विकसित होतील  आणि भारत जगातील अग्रगण्य क्षेत्र बनेल, अशी आशा आहे.          

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1876782) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu