शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत साधला फिनलंडचे शिक्षणमंत्री पेट्री होन्कोनेन यांच्याशी संवाद
शिक्षण, कौशल्य विकास आणि सीमावर्ती संशोधन या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल बैठकीत चर्चा
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2022 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे फिनलंडचे शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती मंत्री पेट्री होन्कोनेन यांच्याशी चर्चा केली. कोविड नंतरच्या आव्हानात्मक काळातील शिक्षण विषयक चर्चा त्यांनी केली. शिक्षणापासून सर्वात वंचित मुलांना शिकण्याच्या संधी देऊन इतर मुले आणि त्यांच्यात असलेले शिकण्याचे अंतर भरून काढण्यासाठी एक दृढ दृष्टीकोन आवश्यक आहे, असे मत दोघांनीही व्यक्त केले. भारतात सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक सुधारणांबाबतही मंत्र्यांनी चर्चा केली. ज्ञानाला द्विपक्षीय सहकार्याचा प्राधान्य स्तंभ बनविण्यावर आणि शिक्षण, कौशल्य विकास तसेच सीमावर्ती संशोधन या सर्व क्षेत्रांमध्ये सखोल काम यावरही त्यांनी फलदायी चर्चा केली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे निर्माण झालेल्या शक्यता आणि संधींमुळे फिनलंडने ज्ञानाच्या आघाडीवर भारताशी सहयोग करण्याविषयी स्वारस्य दाखविल्याबद्दल प्रधान यांनी आनंद व्यक्त केला. अर्ली चाईल्डहूड केअर ॲण्ड एज्युकेशन (ईसीसीई) , शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण या पातळीवर एकमेकांच्या सर्वोत्कृष्ट पद्धतींचा फायदा दोन्ही देशांना होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय उच्च शिक्षण संस्थांसोबत सह/दुहेरी पदवी आणि संयुक्त कार्यक्रमांद्वारे सहकार्य करण्यासाठी फिनिश विद्यापीठांचे स्वागत आहे. परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची संकुले सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी सरकार लवकरच धोरण आणत असल्याची माहितीही प्रधान यांनी दिली.
भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये फिनिश अध्यापनशास्त्रीय विचारसरणीशी मिळतेजुळते अनेक घटक आहेत, असे होन्कोनेन यांनी बैठकीदरम्यान लक्षात आणून दिले. विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन आणि कृतींवर-आधारित अध्यापनशास्त्र हे फिनिश शिक्षण प्रणालीचे मुख्य घटक आहेत. त्यामुळे उभय देशांना शिक्षण क्षेत्रात सहकार्य करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे, असे होन्कोनेन पुढे म्हणाले. या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी, फिनलंडच्या शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने शिक्षणाच्या क्षेत्रात भारतासोबत सहकार्य सक्षम करण्यासाठी फिनिश विद्यापीठांच्या समूहात (क्लस्टर) दरवर्षी 10 लाख युरो पर्यंत विशिष्ट निधीची तरतूद केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1876281)
आगंतुक पटल : 251