राष्ट्रपती कार्यालय
आदिवासी गौरव दिना निमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी भगवान बिरसा मुंडा यांना उलिहाटू येथे श्रद्धांजली अर्पण केली, शहडोल येथील आदिवासी समाजाला राष्ट्रपतींनी संबोधित केले
Posted On:
15 NOV 2022 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त आज सकाळी (15 नोव्हेंबर, 2022) झारखंडमधील उलिहाटू गावाला भेट दिली आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली.
त्यानंतर, राष्ट्रपती मध्यप्रदेशमधील शहडोल येथे पोहोचल्या आणि त्या ठिकाणी आयोजित आदिवासी समागमाला त्यांनी संबोधित केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी आदिवासी गौरव दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, मध्यप्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे. त्यामुळे या राज्यात या समागमाचे आयोजन करणे योग्य आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, न्यायाच्या हितासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना हे आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात, विविध विचारसरणी आणि उपक्रमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आदिवासी समाजाच्या अनेक संघर्षांच्या प्रवाहांचा समावेश आहे. भगवान बिरसा मुंडा आणि झारखंडचे सिद्धू-कान्हू, मध्य प्रदेशचे तंतीया भील आणि भीमा नायक, आंध्र प्रदेशचे अल्लुरी सीताराम राजू, मणिपूरच्या राणी गाईदिनलिऊ आणि ओदिशाचे शहीद लक्ष्मण नायक यांच्यासारख्या महान व्यक्तींनी आदिवासी समाजाचा आणि देशाचा अभिमान वृद्धिंगत केला आहे. मध्य प्रदेशातील अनेक क्रांतिकारक योद्ध्यांमध्ये किशोर सिंह, खाज्या नायक, राणी फूल कुंवर, सीताराम कंवर, महुआ कोल, शंकर शाह आणि रघुनाथ शाह यांचा समावेश होतो. 'छिंदवाड्याचे गांधी' असा ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख होतो, त्या बादल भोई यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अहिंसेचा मार्ग निवडला होता. अशा सर्व स्वातंत्र्ययोद्ध्यांना राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती म्हणाल्या की, मध्य प्रदेशातील चंबळ, माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड आणि महाकोशल प्रदेशातील सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात आदिवासी समुदायांचा मोठा वाटा आहे. आदिवासी राजांच्या कारकिर्दीत समृद्धीने भरलेला हा प्रदेश पुन्हा एकदा आधुनिक विकासाच्या प्रभावी कथा लिहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की बहुतांश आदिवासी प्रदेश जंगल आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. आपले आदिवासी बंधू आणि भगिनी निसर्गावर आधारित जीवन जगतात आणि निसर्गाचे मोठ्या आदराने रक्षण करतात. ब्रिटीश राजवटीत या निसर्गाचे शोषणापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी जोरदार लढा दिला होता. त्यांच्या बलिदानामुळे जंगल संपत्तीचे संवर्धन मोठ्या प्रमाणात शक्य झाले. आजच्या हवामान बदलाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या काळात प्रत्येकाने आदिवासी समाजाची जीवनशैली आणि वनसंवर्धनाबाबतचा त्यांचा निर्धार, यापासून धडा घेण्याची गरज आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आदिवासी समुदाय मानवता आणि निसर्गाला सारखेच महत्व देतो. ते व्यक्तीपेक्षा समाजाला, स्पर्धेपेक्षा सहकार्याला आणि वेगळेपणापेक्षा समानतेला प्राधान्य देतात. स्त्री-पुरुष समानता हे आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी समाजामधील लिंग गुणोत्तर अधिक चांगले आहे. आदिवासी समाजाची ही वैशिष्ट्ये सर्वांसाठी अनुकरणीय आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक पावले उचलली आहेत, याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की देशाचा सर्वांगीण विकास आणि आदिवासी समाजाचा विकास परस्परांशी जोडलेला आहे. म्हणूनच, आदिवासी समाजाची ओळख कायम राहावी, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना वाढावी आणि त्याच वेळी त्यांना विकासाची फळे मिळावीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी भागाचा समरसतेच्या भावनेने विकास करणे सर्वांच्या हिताचे आहे.
राष्ट्रपतींचे हिंदी मधील भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876277)
Visitor Counter : 209