सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 41 व्या आयआयटीएफ अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2022मधील “एमएसएमई दालना”चे उद्घाटन
Posted On:
15 NOV 2022 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे भरलेल्या 41व्या आयआयएफटी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2022 मधील “एमएसएमई दालना”चे उद्घाटन केले. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रताप वर्मा देखील या प्रसंगी उपस्थित होते. नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर हॉल क्रमांक 4 मध्ये हे “एमएसएमई दालन” उभारण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, या मेळाव्याच्या माध्यमातून, एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना, विशेषतः महिला उद्योजक, अनुसूचित जाती आणि जमातींमधील उद्योजक, आकांक्षित जिल्ह्यांमधील उद्योजक यांना त्यांची कौशल्ये तसेच उत्पादने प्रदर्शित करण्याची तसेच विकासासाठी नव्या संधी निर्माण करण्याची आणि त्यायोगे स्वावलंबी होण्याची संधी दिली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांनी एमएसएमई दालनात आपल्या उत्पादने मांडलेल्या अनेक एमएसएमई उद्योजकांची भेट घेतली.या दालनात, वस्त्रोद्योग, अन्न, धातुकाम, सुगंधी द्रव्ये, पादत्राणे, खेळणी, रसायने, विजेवर आधारित उत्पादने, चामडे, प्लास्टिक, रबर, मौल्यवान खडे तसेच दागिने यांच्यासह सुमारे 26 क्षेत्रातील उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत. यावर्षीच्या एमएसएमई दालनात महिला उद्योजकांचा आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात (74%) सहभाग पाहायला मिळत आहे.
देशभरात साजऱ्या होत असलेल्या दुसऱ्या आदिवासी गौरव दिनानिमित्त, केंद्रीय मंत्री राणे यांनी देशाच्या इतिहासात तसेच संस्कृतीमध्ये आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानाचा ठळक उल्लेख करुन आदिवासी भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठीच्या प्रयत्नांना पुनर्चालना देण्याची गरज अधोरेखित केली.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876084)
Visitor Counter : 191