संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी जपानला दिली भेट
Posted On:
10 NOV 2022 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2022
नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी 05 ते 09 नोव्हेंबर 22 या कालावधीत जपानला अधिकृत भेट दिली.
या भेटीदरम्यान नौदल प्रमुखांनी जपानच्या सागरी स्व-संरक्षण दलाने (जेएमएसडीएफ) त्याच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त 06 नोव्हेंबर 22 रोजी योकोसुका येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूचे (आयएफआर) निरीक्षण केले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, जेएमएसडीएफच्या इझुमो या जहाजावर, या फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी झालेल्या नौदलांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांसह उपस्थित होते.
HEHY.jpg)
आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू नंतर, डब्ल्यूपीएनएसचा (पश्चिम प्रशांत नौदल परिषद) वर्तमान अध्यक्ष म्हणून जपानने 07-08 नोव्हेंबर 22 रोजी योकोहामा येथे 18 व्या डब्ल्यूपीएनएसचे आयोजन केले होते. भारतीय नौदल 1998 पासून डब्ल्यूपीएनएस मध्ये निरीक्षक म्हणून भाग घेते. डब्ल्यूपीएनएसवरील आपल्या टिप्पणीमध्ये, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी नियमांवर आधारित व्यवस्थेच्या प्राथमिकतेवर भर दिला आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेसाठी 'सामूहिक जबाबदारी' या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदल आणि इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (आयओएनएस-हिंद महासागर नौदल परिषद ) च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
ROM6.jpeg)
या वर्षी जपानने मालाबार सरावाचेदेखील आयोजन केले आहे. 1992 मध्ये सुरु झालेल्या मालाबार सरावाचे यंदा 30 वे वर्ष आहे. नौदल प्रमुखांनी मालाबार सरावामध्ये सहभागी झालेल्या भारतीय नौदलाच्या शिवालिक आणि कामोर्ता या जहाजांवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मालाबार-2022 सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे एक P8I सागरी गस्ती विमानही जपानमध्ये स्वतंत्रपणे तैनात करण्यात आले आहे. मालाबार सरावाचा सागरी टप्पा 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहील.
जपानमधील बहुपक्षीय सरावांमधील नौदल प्रमुखांच्या सहभागामुळे आयएफआर आणि डब्ल्यूपीएनसाठी उपस्थित असलेल्या मित्र देशांच्या शिष्टमंडळांच्या अनेक प्रमुखांबरोबर अर्थपूर्ण द्विपक्षीय बैठका घेण्याची संधी मिळाली. नौदल प्रमुखांच्या जपान भेटीमुळे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील बहुपक्षीय सागरी सुरक्षेसाठीचा भारताचा सातत्त्यपूर्ण पाठिंबा प्रदर्शित झाला, आणि जपानबरोबरच्या उच्च स्तरीय द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला बळ मिळाले.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875051)
Visitor Counter : 222