नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गोव्यातील नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेच्या (सीएएनएसओ) आशिया पॅसिफिक परिषदेला दृकश्राव्य माध्यमातून केले संबोधित


"भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्र पुढील 7 ते 10 वर्षात सुमारे 40 कोटी प्रवासी वाहतूक करण्याची शक्यता" - ज्योतिरादित्य शिंदे

“भारतीय हवाई वाहतूक उद्योग कोविडपूर्व प्रवासी वाहतुकीच्या जवळपास 95% पर्यंत पोहोचला आहे”- जनरल (डॉ.) विजय कुमार सिंग (निवृत्त)

Posted On: 02 NOV 2022 4:21PM by PIB Mumbai

पणजी, 2 नोव्हेंबर 2022

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री जनरल (डॉ.) विजय कुमार सिंग आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेच्या (सीएएनएसओ) आशिया पॅसिफिक परिषदेचे उद्घाटन केले. आज गोव्यात जागतिक विचारसरणी, प्रादेशिक सहयोग, स्थानिक पूर्तता ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, सीएएनएसओ चे महासंचालक सायमन हॉक्वार्ड, सीएएनएसओ चे आशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक पोह थेन सोह उपस्थित होते. या परिषदेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले.

दृकश्राव्य माध्यमातून केलेल्या भाषणात, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, या परिषदेने संपूर्ण आशिया पॅसिफिकमधील तज्ञांना एकत्र आणले आहे, जे जागतिक हवाई वाहतुकीच्या 35% ते 40% पर्यंत योगदान देतात. ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत आहे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्र पुढील 7 ते 10 वर्षांमध्ये सुमारे 40 कोटी प्रवाशांची वाहतूक करेल. ते म्हणाले की, परिषदेची संकल्पना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी अनुरूप आहे.

परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) म्हणाले की, विमान वाहतूक उद्योग जवळजवळ 3.5 ट्रिलियन डॉलर्सचे पाठबळ देतो जे जागतिक जीडीपी च्या जवळपास 1.4% आहे. ते म्हणाले की कोविड-19 महामारीच्या काळात उद्योगाला मोठा फटका बसला असला तरी, जगभरातील देशांतर्गत वाहतूक आता सुधारत आहे. भारतात, हवाई वाहतूक उद्योग कोविडपूर्व प्रवासी वाहतुकीच्या जवळपास 95% पर्यंत पोहोचला आहे, असे मंत्री म्हणाले.

त्यांनी निरीक्षण नोंदवले की हवाई वाहतूक सेवा प्रदाता (एएनएसपी) सेवा ही हवाई वाहतुकीची सर्वात महत्त्वाची बाब आहे. जनरल (डॉ.) विजय कुमार सिंग यांनी हवाई उद्योगाला तंत्रज्ञानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळात हवाई क्षेत्राचा विकास होणार आहे, केवळ विमाने नाही तर हवेत उडणाऱ्या अनेक साधनांचा समावेश असेल. त्यामुळे आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रसंगी माहिती दिली की गोव्याच्या नव्याने विकसित झालेल्या मोपा विमानतळाला हल्लीच डीजीसीए परवाने मिळाले आहेत. नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल, ज्यामुळे गोव्यात पर्यटनाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी भारतासाठी परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, या परिषदेत ज्या मुद्यांवर चर्चा केली जात आहे, ते भारतातील नागरी हवाई वाहतुकीच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत.

सीएएनएसओ चे महासंचालक सायमन हॉक्वार्ड, यांनी कार्यक्षमता सुधारण्यावर भर दिला. ते म्हणाले की कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि अधिक वाढीव, शाश्वत आणि लवचिक प्रणाली तयार करणे हे हवाई वाहतूक उद्योगासाठी कधीही अधिक निकडीचे नव्हते.

सीएएनएसओ

सीएएनएसओ- नागरी हवाई वाहतूक सेवा संस्था, हवाई वाहतूक व्यवस्थापन (एटीएम) उद्योगाचे जागतिक स्तरावरचे व्यासपीठ आहे आणि ते आपल्या भविष्यातील आकाशाला आकार देत आहे. याचे सदस्य जगातील 90% पेक्षा जास्त हवाई वाहतुकीला समर्थन देतात. यामध्ये हवाई वाहतूक सेवा पुरवठादार, हवाई क्षेत्र वापरकर्ते आणि संचालक, उत्पादक आणि हवाई वाहतूक उद्योग पुरवठादार यांचा समावेश आहे. ही संस्था ज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेष सामायिक करण्यासाठी उद्योगांना परस्परांशी जोडून जागतिक हवाई वाहतूक व्यवस्थापनाच्या कामगिरीवर देखरेख ठेवते.       

भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), आयसीएओ द्वारे भारतासाठी निश्चित करण्यात आलेले भारतीय उपखंडातील हवाई क्षेत्र आणि लगतच्या महासागरीय हवाई क्षेत्रामध्ये हवाई वाहतूक सेवांची तरतूद करण्यासाठी जबाबदार आहे. एएआय भारतातील प्रमुख विमानतळ ऑपरेटर (संचालक) म्हणून देखील काम करते. या अंतर्गत ते 133 विमानतळांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. यात 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 78 देशांतर्गत विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ आणि 21 नागरी विमानतळांचा समावेश आहे. देशभरातली हवाई संपर्क सक्षमता वाढवणे आणि किफायतशीर, आधुनिक, सुरक्षित विमानतळ ऑपरेशन्स आणि हवाई वाहतूक सेवांसाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाबाबत जागरूक संस्था बनणे, या अभियानासह जगातील आघाडीचे विमानतळ विकासक, ऑपरेटर आणि हवाई वाहतूक सेवा पुरवठादार बनणेहा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा दृष्टीकोन आहे.

 

 

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1873066) Visitor Counter : 287


Read this release in: English , Urdu , Hindi