संरक्षण मंत्रालय

जोधपूर हवाई तळावर ‘गरूड- VII’ सराव

Posted On: 28 OCT 2022 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

भारतीय हवाई दल (आयएएफ) आणि फ्रेंच हवाई  आणि अंतराळ दल (एफएएसएफ) यांच्यावतीने दि. 26 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत जोधपूर हवाई तळावर ‘गरूड – VIl’ अंतर्गत व्दिपक्षीय सराव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सराव कार्यक्रमामध्‍ये एफएएसएफची चार राफेल लढाऊ  विमाने, एक ए- 330 मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (एमआरटीटी) विमान आणि 220 जवानांची तुकडी सहभागी होत आहेत. भारतीय हवाई दलाची एसयू- 30 एमकेआय, राफेल, एलसीए तेजस आणि जग्वार लढाऊ विमाने तसेच एलसीएच म्हणजेच लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि एमआय- 17 हेलिकॉप्टरचा ताफा या सरावामध्‍ये सहभागी होत आहे. भारतीय हवाई दलामध्‍ये फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, एडब्ल्यूएसीएस आणि एईडब्ल्यूअँडसी सारख्‍या लढण्यास सक्षम साधनांचाही समावेश आहे. हा संयुक्‍त सराव उभय देशांना कार्यात्मक क्षमता आणि दोन्‍ही देशांची संलग्नपणे कार्य करण्‍याची क्षमता वाढविण्‍यासाठी एक मंच प्रदान करणार आहे, त्याचबरोबर सर्वोत्कृष्‍ट कार्यपद्धती सामायिक करेल.

या दोन्ही देशांमध्‍ये होत असलेल्या संयुक्त सरावाची ही सातवी आवृत्ती आहे. पहिल्या , तिस-या  आणि पाचव्या आवृत्तीचे संयुक्‍त सराव  भारतामध्‍ये वर्ष  2003, 2006 आणि 2014 मध्‍ये ग्वाल्हेर, कलाईकुंडा आणि जोधपूर हवाई तळावर पार पडला.  तर दुस-या , चौथ्या  आणि सहाव्या आवृत्तीतील  संयुक्‍त सराव 2005, 2010 आणि 2019 मध्‍ये फ्रान्समध्‍ये आयोजित करण्‍यात आले होते.

भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई दल  यांच्यामध्‍ये  होत असलेल्या संयुक्‍त सरावामुळे उभय देशांमधील व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ करण्‍याबरोबरच व्यावसायिक संवाद, अनुभवांची देव-घेव आणि कार्यात्मक ज्ञानवृद्धीला प्रोत्साहन मिळेल.

 

S.Kane/S.Bedekar/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871643) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi