संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बीआरओने सहा राज्‍ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये बांधलेले 75 पायाभूत सुविधा प्रकल्प संरक्षण मंत्र्यांनी राष्‍ट्राला केले समर्पित

Posted On: 28 OCT 2022 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दि. 28 ऑक्टोबर, 2022 रोजी लडाखमधील डी-एस-डीबीओ मार्गावर आयोजित एका कार्यक्रमामध्‍ये बीआरओ म्हणजेच सीमा रस्‍ते संघटनेच्या वतीने बांधण्‍यात आलेले  75 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्‍ट्राला  समर्पित केले. यामध्‍ये  45 पूल, 27 रस्‍ते, दोन हेलिपॅड आणि एक शून्य कार्बन वसाहत यांचा समावेश आहे. हे प्रकल्प सहा राज्‍ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये उभारण्‍यात आले आहेत. यापैकी 20 प्रकल्प जम्मू आणि काश्‍मीर मध्‍ये आहेत; तर लडाख आणि अरूणाचल प्रदेशात प्रत्‍येकी 18 प्रकल्प उभारले  आहेत. तसेच उत्तराखंडमध्‍ये पाच आणि इतर चौदा प्रकल्प सीमेवरच्‍या सि‍क्कीम, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्‍यांमध्‍ये उभारले आहेत.

बीआरओने  एकूण 2,180 कोटी रुपये खर्चून उभारलेले हे सर्व प्रकल्प धोरणात्म‍क दृष्‍टीने महत्वाचे असून या सर्व प्रकल्पांचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. तसेच यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला आहे. यापैकी बहुतांश प्रकल्‍पांचे काम एकाच हंगामामध्‍ये पूर्ण झाले आहे. अतिशय प्रतिकूल हवामानामध्‍ये प्रकल्पाचे काम पूर्ण केल्याबद्दल बीआरओच्या धैर्याचे आणि दृढसंकल्पाचे कौतुक करताना संरक्षण मंत्री म्हणाले, या प्रकल्पांमुळे देशाच्या संरक्षण सज्जतेला चालना मिळेल  तसेच सीमावर्ती भागाचा आर्थिक विकास सुनिश्चित होईल.

लडाखमधल्या डी-एस-डीबीओ मार्गावरील 14,000 फूट उंचीवर 120 मीटर लांबीच्या ‘ 70 श्योक सेतूचे’ प्रत्यक्ष ठिकाणी  होत असलेले  उद्घाटनहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. हा पूल सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहेकारण या पुलामुळे  सशस्त्र दलाची  वाहतुकीची सोय होणार आहे. संरक्षण  मंत्र्यांनी  आभासी माध्‍यमातून   उद्घाटन केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये पूर्व लडाखमधील हॅनले आणि थाकुंग येथील  प्रत्येकी एक हेलिपॅडचा समावेश आहे. या हेलिपॅडमुळे या प्रदेशात भारतीय हवाई दलाची परिचालन क्षमता वाढेल.

बीआरओच्या कर्मचाऱ्यांसाठी 19,००० फूट उंचीवर असलेल्या पहिल्या कार्बनमुक्त  वसाहतीचेही हॅनले येथे उद्घाटन करण्यात आले. लडाखला देशाचा पहिला कार्बन मुक्त  केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या संकल्पाला हातभार लावण्याचा हा बीआरओचा प्रयत्न आहे.

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुर्गम  भागांची प्रगती सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि सशस्त्र दलांच्या शौर्य दाखविणा-या जवानांसाठी  पायाभूत सुविधांचा विकास करण्‍यावर  भर असल्याचे सांगितले.  उत्तरेकडील क्षेत्रामध्‍ये  अलीकडच्या काळात ज्या  परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी भारत सिद्ध आहे. हे नवीन 75 प्रकल्प म्हणजे त्या संकल्पाचा पुरावा आहे, असे म्हणता येईल.  राजनाथ सिंह पुढे  म्हणाले की हे पूल, रस्ते आणि हेलिपॅड्स देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्य भागांच्या दूरवरच्या भागात लष्करी आणि नागरी वाहतूक सुलभ करतील. हे प्रकल्प विकास साखळीचा एक भाग बनणार आहेत.

याप्रसंगी  राजनाथ सिंह यांनी चंदीगडमध्ये बांधण्यात येत असलेल्या हिमांक एअर डिस्पॅच संकूल आणि लेह येथील बीआरओ संग्रहालयाची पायाभरणीही केली. हिवाळा सुरू झाल्यावर, जोरदार  बर्फवृष्टीमुळे खिंडीतील मार्ग बंद झाल्यावरदुर्गम भागात कार्य करण्‍यासाठी माणसांबरोबरच , यंत्रसामग्री आणि साहित्य यांची ने-आण करण्‍यासाठी  हवाई साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि बीआरओच्या कामगिरीला संस्थात्मक स्‍वरूप देवून ते सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी लेह येथे एक संग्रहालय उभारण्‍यात येत आहे.  हे  संग्रहालय  माहितीपूर्ण  आणि प्रेरणा स्त्रोत असेल. या संग्रहालयाची इमारतही त्रिमितीय   प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बांधण्‍यात येणार आहे. या संग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यावर ती जगामध्‍ये  सर्वात उंच   त्रिमितीय  इमारत असणार आहे.

 

 S.Kane/S.Bedekar/ P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1871557) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil