संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कर साजरा करीत आहे 76 वा पायदळ दिवस

Posted On: 27 OCT 2022 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

भारतीय लष्कराचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या पायदळाचे देशरक्षणातील योगदान गौरविण्यासाठी दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. 1947 साली या दिवशी भारतीय लष्करातील पायदळाचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले घुसखोर मागे वळले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. म्हणून देशाच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Wreathlaying(1)53W6.jpeg

देशासाठी त्याग व बलिदान केलेल्या पायदळातील जवानांना आज राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. जनरल अनिल चौहान, संरक्षण दलांचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्यासह लष्कराचे उपप्रमुख, वेगवेगळ्या रेजिमेंटचे कर्नल यांनी पुष्पचक्रे अर्पण केली. ‘कीर्ती चक्रा’ने सन्मानित निवृत्त लेफ्टनंट कर्नल राम सिंह सहारन, ‘परमवीर चक्रा’ने सन्मानित निवृत्त सुभेदार मेजर व मानद कप्तान योगेंद्र सिंह यादव आणि ‘वीर चक्रा’ने सन्मानित निवृत्त शिपाई सरदार सिंह यांनी पायदळातील निवृत्त जवानांच्या वतीने पुष्पचक्रे अर्पण केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Wreathlaying(2)Z3F0.jpeg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पायदळ दिवस साजरा करण्यासाठी जम्मू-कश्मीरमधील उधमपूर, गुजरातेतील अहमदाबाद, तमिळ नाडूतील वेलिंग्टन आणि मेघालयातील शिलाँग अशा चार दिशांकडून निघालेल्या मोटरसायकल रॅली आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचल्या तेव्हा संरक्षण दलाच्या प्रमुखांनी झेंडा फडकावून त्यांचे स्वागत केले. या सर्व मोटारसायकलस्वारांनी मिळून 10 दिवसांत 8,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले. या प्रवासादरम्यान त्यांनी वीर महिला, निवृत्त जवान, राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्र व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शौर्य, त्याग, निःस्वार्थी कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिकतेच्या मूल्यांप्रती पुन्हा एकदा स्वतःला स्वाधीन करावे. तसेच, देशाचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीवर ठाम राहावे, असे पायदळाच्या महासंचालकांनी आज सर्व जवानांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.


* * *

S.Thakur/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871254) Visitor Counter : 219


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil