संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाने 20 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक दलाकडे सोपवले

Posted On: 26 OCT 2022 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

 

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य समन्वय ठेवून केलेल्या शोध आणि बचाव (SAR) कार्यामुळे, भारतीय तटरक्षक दल त्यांचे प्राण वाचवू शकले. "सित्रांग" चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने या मच्छीमारांच्या बोटी उलटलेल्या पाहिल्या आणि  शोध आणि बचाव पथकाला (SAR) सतर्क केले आणि तातडीने त्यांची सुटका करून बांगलादेश तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनार्‍याजवळील परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या नाविकांना मदत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने "सित्रांग" चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर आपली डॉर्नियर विमान  सेवा सुरू केली होती.  ही टेहळणी मोहीम सुरू असताना, भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने सुमारे 20 व्यक्तींना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेपासून(IMBL) सुमारे 90 सागरी मैल(NM) अंतरावर उलटलेल्या बोटीं आणि त्यातील तरंगणाऱ्या सामग्रीच्या आधाराने  पाण्यात तरंगताना पाहिले. आयसीजी (ICG) ने आजूबाजूच्या परिसरात जीव वाचवण्यासाठी आवश्यक    असलेले जीवरक्षक तराफे टाकले आणि ते लोक तराफ्यात चढेपर्यंत ते त्या परिसरातच राहिले. त्यानंतर ICG च्या विमानाने मलेशियातील पोर्ट क्लांग येथून कोलकाता येथे जात असलेल्या, जवळच असलेले व्यापारी जहाज "नांता भूम"ला आपला मार्ग बदलण्याची आणि तराफ्यातील 20 जणांना बोटीमध्ये नेण्याची सूचना केली.

भारतीय तटरक्षक दलाचे विजया, वरद आणि C-426 ही जहाजे शोध आणि बचाव कार्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी कार्यरत होती,त्यानंतर 20 बांगलादेशी मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने (ICG) जहाज विजया   च्या ताब्यात दिले.भारतीय तटरक्षक दल आणि बांग्लादेश तटरक्षक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, बांगलादेश तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी ICG जहाजावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने मच्छिमारांची तपासणी केली.

इथे हे ही नमूद करावे लागेल की, भारतीय तटरक्षक दलाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारांच्या समन्वयाने, येऊ घातलेल्या हवामान/ चक्रीवादळामुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी निर्धारित केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार पूर्वकल्पना आणि प्रतिबंधात्मक कार्य सुरू केलले होते आणि आयएमडीने “सित्रांग” चक्रीवादळाच्या संदर्भात भाकीत केलेले “कमी दाबाचे क्षेत्र” तयार होण्याचे पहिले संकेत मिळाल्यानंतर सर्व मासेमारी नौकांचे वेळेवर आणि सुरक्षित परतावे याची खातरजमाही केली होती. हा इशारा बांगलादेश तटरक्षक दलालाही देण्यात आला होता. चक्रीवादळाच्या  संपूर्ण कालावधीत, भारतीय तटरक्षक दलाच्या रडार स्टेशन आणि रिमोट ऑपरेटिंग स्टेशनद्वारे सल्ला प्रसारित केला गेला होता.


* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871073) Visitor Counter : 118


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Tamil