आयुष मंत्रालय
देशभरात 7 वा आयुर्वेद दिवस मोठ्या प्रमाणात साजरा
आयुष क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्यात झाला सामंजस्य करार
आयुष मंत्रालयाच्या ‘आय सपोर्ट आयुर्वेद’ मोहिमेला 1.7 कोटींहून अधिक लोकांचा पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2022 5:02PM by PIB Mumbai
7 वा आयुर्वेद दिवस आज भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. “हर दिन हर घर आयुर्वेद” ही या वर्षीच्या आयुर्वेद दिनाची मुख्य संकल्पना असून आयुर्वेदाचे फायदे तळागाळातील लोकांसह मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचावेत हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. सहा आठवडे चाललेल्या या सोहळ्यात देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग नोंदवला गेला. या निमित्ताने, भारत सरकारची २६ हून अधिक मंत्रालये आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय मिशन आणि दूतावासांच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाच्या संस्था/ परिषदांनी 5000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा; आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल; परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी; आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई यांच्यासह अनेक परदेशी दूतावास आणि जागतिक आरोग्य संघटना (SEARO) यांच्या प्रतिनिधींचा कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये समावेश होता.

आयुर्वेद हे रोग प्रतिबंधक शास्त्र असल्याचे यावेळी सर्बानंद सोनोवाल उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. आयुर्वेद आणि त्याच्या क्षमता लोकांपर्यंत पोहोचवणे हा हर दिन हर घर आयुर्वेद या उपक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
"आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे जे केवळ आजारी पडल्यावर उपचारच नाही, तर रोगापासून बचाव करण्याविषयीही सांगते." असे अर्जुन मुंडा यावेळी म्हणाले.
आयुष मंत्रालयाने देशातील आयुष उपचार पद्धतीला गती दिली असून आयुर्वेदाला आता जगातील 30 देशांमध्ये मान्यता मिळाली आहे, अशी माहिती डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई यांनी दिली.

“आपल्या पूर्वजांच्या विज्ञानाचे कौतुक करण्याची हीच वेळ आहे, असे मीनाक्षी लेखी म्हणाल्या. आयुर्वेद दिनानिमित्त 5000 वर्षांहून अधिक प्राचीन अशा विज्ञानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली गौरव केला जात आहे असेही त्या म्हणाल्या.
'आय सपोर्ट आयुर्वेद' या मोहिमेला सर्वांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला असून या उपक्रमा अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमात देशभरातून 1.7 कोटींहून अधिक लोक सहभागी झाले, तसेच 56 लाखांहून अधिक लोकांनी आयुर्वेद दिनानिमित्त विविध संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये योगदान दिल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या संचालक प्राध्यापक तनुजा नेणारी यांनी दिली.
पुराव्यावर आधारित नियोजन आणि क्षमता बांधणीद्वारे आदिवासी संस्कृतीचा वारसा जतन करत आदिवासी विकासासाठी दोन्ही मंत्रालयांमधील सहयोग, एककेंद्राभिमुखता आणि समन्वय या क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी आयुष मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
याप्रसंगी ‘द आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया’, ‘द आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विविध श्रेणीतील पाच शॉर्ट व्हिडिओ स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्यांचा केंद्रीय आयुष मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
***
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1870469)
आगंतुक पटल : 291