गृह मंत्रालय

'पोलीस स्मृतिदिना' निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पोलीस आणि सीएपीएफच्या  शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली


देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील पोलीसदले अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली जबाबदारी पार पाडत असल्यामुळे देशाची विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरु

“भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, आपण  निर्धाराने आणि वेगाने आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे  वाटचाल करत आहोत हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आज आपण समाधानाने म्हणू शकतो” : केंद्रीय गृहमंत्री

Posted On: 21 OCT 2022 4:52PM by PIB Mumbai

 

'पोलीस स्मृती दिना'निमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ)  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री  जयकुमार मिश्रानिशीथ प्रामाणिक आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि आपण निर्धाराने आणि वेगाने आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे वाटचाल करत आहोत हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आज आपण समाधानाने म्हणू शकतो, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. पोलिस आणि सीएपीएफच्या शूर जवानांचे सर्वोच्च बलिदान हे देशाने केलेल्या अतुलनीय  कामगिरीतील महत्वाचे योगदान आहे, असे शाह म्हणाले. देशाची  अंतर्गत सुरक्षा आणि सीमांचे रक्षण करताना देशभरातील पोलीस दले आणि सीएपीएफच्या 35,000 हून अधिक जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि भारत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत राहील, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कृतज्ञ देशाच्या वतीने त्या सर्व शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित रहावी म्हणून देशभरातील  पोलीस दले अत्यंत कठीण परिस्थितीत देखील आपली जबाबदारी पार पडतात आणि कर्तव्य बजावतात आणि त्यामुळेच भारतासारखा विशाल देश आज विकासाच्या मार्गावर प्रगती करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या काही वर्षांत देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे असे अमित शाह म्हणाले. यापूर्वी ईशान्येकडे तसंच  जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजच हिंसेची प्रकरणं नोंदवली जात होती आणि हा प्रदेश डाव्या कट्टरपंथी कारवायांना बळी पडत होता. मात्र गेल्या आठ वर्षांमध्ये, ईशान्य भारतात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याच्या (आफ्स्पा) जागी, तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष अधिकार दिले जात आहेत. शाह म्हणाले की ईशान्येकडील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 70% पेक्षा जास्त घट होणे, हे ईशान्येकडील राज्यांच्या समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील पूर्वी तरुणांकडून दगडफेक केली जायची, आता तेच तरुण पंच आणि सरपंच बनून जम्मू आणि काश्मीरच्या विकासामध्ये लोकशाहीच्या मार्गाने योगदान देत आहेत. ते म्हणाले की नक्षलवाद बाधित भागात पूर्वी हिंसाचाराची अनेक प्रकरणं नोंदवली जायची पण आज एकलव्य शाळांमध्ये राष्ट्रगीत गायले जात आहे आणि प्रत्येक घरात तिरंगा झेंडा फडकवला जातो.

 

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक सक्रीय पावले उचलली आहेत आणि देशभरातली पोलीस दले आणि सीएपीएफने हे प्रयत्न देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले  आहेत. ते म्हणाले की देशातील बहुतांश हॉटस्पॉट (हिंसाचारग्रस्त प्रदेश) देशविरोधी कारवायांपासून जवळजवळ मुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शाह यांनी दिली.

***

R.Aghor/S.Chavan/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869990) Visitor Counter : 179