आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते अहमदनगर इथे आरोग्यविषयक विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
भारत लवकरच, वैद्यकीय पर्यटनाचे जागतिक केंद्र बनेल: केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
आरोग्यविषयक पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीतून आपण एका निरोगी आणि समृद्ध समाजाकडे वाटचाल करतो आहोत: केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2022 5:40PM by PIB Mumbai
गोवा, 20 ऑक्टोबर 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात अहमदनगर इथे आरोग्याशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यात, अहमदनगर इथल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन तसेच, डॉ विखे पाटील कर्करोग केंद्र आणि डॉ विखे पाटील न्युक्लिअर मेडिसीन सेंटरचा समावेश आहे. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीत गुंतवणूक करुन, भारत एका निरोगी आणि समृद्ध भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत यावेळी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ मनसुख मांडवीय यांनी, राळेगणसिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे आणि कर्मचारी निवासस्थानांचेही उद्घाटन केले. 702 लाख रुपयांच्या खर्चातून हे प्राथमिक केंद्र आणि निवासी संकुल उभारण्यात आले आहे. तसेच, खर्डा इथल्या राळेगणसिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे आणि कर्मचारी निवासस्थानांचेही त्यांनी उद्घाटन केले. या इमारतींसाठी 560 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्याशिवाय, पाधेगांव इथे, 214 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी, डॉ विखे पाटील कर्करोग केंद्र आणि डॉ विखे पाटील न्यूक्लियर मेडिसिन सेंटरचेही उद्घाटन केले. अत्याधुनिक वैद्यकीय साधने आणि उपकरणांनी सुसज्ज अशा ह्या केंद्रातून, रुग्णांना सर्वंकष चिकित्सा आणि उपचार सेवा दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देश वेगाने प्रगती करत आहे, असे यावेळी बोलतांना डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितले. सरकारने आरोग्याची विकासाशी सांगड घातली आहे, कारण, केवळ निरोगी नागरिकच देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. “आपला भर निरोगी नागरिकांवर तसेच उपचारांवर असायला हवा. नागरिक आजारी पडणारच नाही, यावर भर देत आपण आधी प्रतिबंधक उपचार पद्धतींवर भर द्यायला हवा, हा विचार करुनच आम्ही आरोग्य आणि निरायमता केंद्रावर भर देत आहोत.” असे मनसुख मांडवीय म्हणाले.
आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोणतेही धोरण कसे भविष्याचा वेध घेणारे असावे, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सरकार केवळ आरोग्य सुविधा निर्माण करत नसून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा देखील वाढवत आहे. ते पुढे म्हणाले की देशातील तरुण वैद्यकीय महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडतील, तोपर्यंत आपला देश जगभरातील रुग्णांना उपाचार पुरवून वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र म्हणून परिवर्तीत झाला असेल. सर्वांचे कल्याण, हा भारताच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची आधारशिला असल्याचे मंत्री म्हणाले. भारत सरकारच्या संशोधन धोरणावर बोलताना डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, जगातल्या दर 10 शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रज्ञावंतांमध्ये जवळजवळ 3 जण भारतीय आहेत. ते म्हणाले की, सरकारचे संशोधन धोरण हे प्रतिभावान तरुणांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्याचे आहे, जे नवोन्मेषी संशोधन प्रकल्प राबवू इच्छितात, मग ते खाजगी संस्थेतील असोत की सार्वजनिक संस्थेतील असोत. नवोन्मेष आणि संशोधनात अग्रेसर राहण्याचे भारताचे लक्ष्य असल्याचे डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

संमेलनाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना, पद्म भूषण अण्णा हजारे यांनी, राळेगणसिद्धी या गावासह अहमदनगर जिल्ह्यातल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्याबद्दल, भारत सरकारचे आभार मानले. अहमदनगर इथले खासदार आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुजय विखे पाटील यांनी, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1347 लाख रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचे नमूद केले. येत्या वर्षभरात पूर्ण होण्याचा अंदाज असलेल्या जिल्ह्यातल्या 47 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक आरोग्यविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्राचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी मतदारसंघाचे खासदार डॉ. सदाशिव लोखंडे, आणि इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील रेडिएशन अँड कॅन्सर सेंटर:
या केंद्राची स्थापना 2017 मध्ये झाली. यात सहा इलेक्ट्रॉन एनर्जीसह तिहेरी ऊर्जा व्यापक लिनीयर म्हणजे एकाच वेगाने जाणारे अॅक्सलरेटर (6,10,15 MV) फोटॉन आहे. मध्य महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान आणले गेले आहे. हा लिनीयर अॅक्सलरेटर VMAT, IGRT, IMRT, 3DCRT सारख्या तंत्रांनी सुसज्ज आहे. उच्च डोस रेट सिक्स चॅनल सुविधा असलेलेही हे मध्य महाराष्ट्रातील एकमेव कर्करोग केंद्र आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, एंडोमेट्रियमचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग तसेच आणि डोके आणि मानेच्या कर्करोगासाठी ह्या केंद्रात इंट्राकॅव्हिटरी / इंट्राल्युमिनल / इंटरस्टिशियल ब्रॅकीथेरपी यासारख्या प्रक्रिया केल्या जातात. 23 मार्च 2017 रोजी या केंद्रात पहिल्या रुग्णावर उपचार केले गेले. सप्टेंबर 2022 पर्यंत इथे सुमारे 40000 रूग्णांवर केमोथेरपी, 5000 रूग्णांवर रेडिओथेरपी आणि 800 रूग्णांवर ब्रॅकीथेरपी असे उपचार करण्यात आले. लवकरच, ह्या केंद्रात स्टिरियोटॅक्टिक रेडिओसर्जरी (SRS) आणि स्टिरियोटॅक्टिक रेडिओथेरपी (SRT) प्रणाली आणून हे केंद्र अधिक अद्ययावत केले जाणार आहे.
डॉ. विखे पाटील न्यूक्लियर मेडिसिन सेंटर:
हे केंद्र संपूर्ण शरीराचे पीईटी-सीटी स्कॅन मशीन, ड्युअल हेड गामा कॅमेरा आणि रेडिओन्यूक्लाइड उपचारासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. पीईटी-सीटी स्कॅन मशीनमध्ये 4 रिंग पीईटी गॅन्ट्री डिटेक्टरसह 16 स्लाइस सीटी स्कॅन असतात. आयोडिन 131, स्ट्रॉनशियम , DOTA, पैलेडियम सारख्या रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने रेडिओन्यूक्लाइड उपचार करता येतात. या केंद्रात, एकाच छताखाली कॅन्सरचे निदान आणि उपचारांसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अहमदनगर जिल्हा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या बीड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यातल्या रुग्णांना या केंद्रात उपचार घेता येतील. या 100 किलोमीटर परिसरातले कर्करोगाच्या रुग्णांसाठीचे हे एकमेव न्यूक्लियर मेडिसिन सेंटर आहे.
* * *
PIB Panaji | S.Patil/R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1869632)
आगंतुक पटल : 353