संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पुरवठा साखळ्या एकमेकांना जोडण्यासाठी गुंतवणूकदार आणि परदेशी उपकरणांच्या उत्पादकांनी (OEMs) भारतीय संरक्षण क्षेत्राचा भाग व्हावे असे संरक्षण मंत्र्यांचे आवाहन


भारतीय संरक्षण उद्योग भविष्याचा वेध घेणारी शस्त्रे आणि प्रणाली विकसित करण्यासाठी सक्षम असल्याचा डेफएक्स्पो 2022 मध्ये गुंतवणूकदारांसाठीच्या ‘इन्व्हेस्ट फोर डिफेन्स’ कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

Posted On: 20 OCT 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2022

 

गुजरातमध्ये गांधीनगर इथे सुरु असलेल्या 12व्या डेफएक्स्पोचा भाग म्हणून, ऑक्टोबर 20, 2022 रोजी  गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘संरक्षण क्षेत्रासाठी गुंतवणूक करा (इन्व्हेस्ट फोर डिफेन्स)’ या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्थानिक उद्योग आणि परदेशी उपकरणांच्या उत्पादकांनी (OEMs) भारतीय संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी आणि जागतिक पुरवठा साखळ्या एकमेकांशी जोडण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.   

स्थानिक उद्योग आणि व्यवसायांच्या उत्साही सहभागावर भाष्य करताना, संरक्षणमंत्री म्हणाले की, उद्योगांमधील भागधारकांचा विश्वास आश्वासक आहे आणि यामधून भारतीय संरक्षण क्षेत्रावरचा त्यांचा विश्वास प्रतिबिंबित होत आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय संरक्षण उद्योगाचा हा सुवर्णकाळ असून येत्या काही वर्षांत त्याची खूप मोठ्या प्रमाणात भरभराट होईल. संरक्षण क्षेत्रासाठीच्या सरकारच्या भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारताचे संरक्षण उत्पादन 2025 पर्यंत 12 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून 22 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे आगामी वर्षांमध्ये या उद्योगाच्या वाढीसाठी अतुलनीय संधी उपलब्ध होतील, ते म्हणाले.   

आर्थिक विकास अथवा संरक्षण, यामधील एकच पर्याय निवडण्याच्या पूर्वीच्या दृष्टीकोनावर त्यांनी आक्षेप व्यक्त केला, आणि म्हणाले की हे पर्याय एकमेकांना पूरक आहेत. गेल्या काही वर्षांत हा दृष्टीकोन बदलला असून आता या दोन्ही संकल्पना एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत आणि त्या एकमेकांना बळकट करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. “देश आज एकमेकांना पूरक असलेल्या या दोन क्षमतांना घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहे आणि दोन्ही क्षमतांमध्ये अतुलनीय सुधारणा करत आहे,” राजनाथ सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक आणि सामरिक क्षमता आवश्यक आहेत.     

भारतीय संरक्षण उद्योगाच्या यशाबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, लढाऊ विमानं, विमान वाहक विमानं, मेन बॅटल टँक आणि आक्रमण करणारी हेलिकॉप्टर याची निर्मिती करून देशातल्या उद्योगांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, आणि या प्रकल्पांमधून ही व्यवस्था निर्माण करण्याचा अनुभव मिळवला आहे. ”हा अनुभव पुढील पिढ्यांसाठी संरक्षण शस्त्रे/प्रणाली विकसित करायला आणि त्याला आधार द्यायला उपयोगी ठरेल”, ते म्हणाले. डेफएक्स्पो 2022 हे सध्याच्या आणि संभाव्य गुंतवणूकदरांसाठी भारतीय संरक्षण उद्योगाच्या अभूतपूर्व विकासाचा भाग बनण्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. 

गुंतवणूकदारांनी आपला नफा बघणे स्वाभाविक असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले आणि गुंतवणूकदारांना भारतीय संरक्षण उद्योगात मूल्य गुणोत्तराचा प्रस्ताव दिला. आपल्या देशाकडे कुशल मनुष्यबळ आणि निरोगी लोकसंख्या आहे आणि या पैलूला बळकट करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत असे ते म्हणाले.   त्यांनी अशा काही आर्थिक उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली, ज्यामुळे बँकांना कर्ज द्यायला आणि भांडवलाची उपलब्धता वाढवायला मदत झाली आणि उद्योग भांडवल निधी संकृतीला चालना मिळाली.   

संरक्षण मंत्री म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सरकारने सीएसआयआर आणि डीआरडीओ सारख्या संस्थांसाठी लॅब आणि उद्योगांच्या जोडणीमध्ये सुधारणा केली आहे, तसेच संरक्षण दलाची उत्पादने, प्रणाली आणि प्रक्रिया याच्या श्रेणीतील सुधारणा आणि नवोन्मेष याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) आणि तंत्रज्ञान विकास निधी यासारखे उपक्रम सुरू केले. थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम थेट मार्गाने 74%, तर सरकारी मार्गाने 100% शिथिल करण्यात आले आहेत आणि शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक झाले आहेत, ज्यामुळे संरक्षण कंपन्यांना देखील फायदा झाला आहे, ते म्हणाले.   

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869603) Visitor Counter : 199