विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज, 15 ऑक्टोबर रोजी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआयआर सोसायटीची बैठक
सीएसआयआर ने त्यांच्या शताब्दीपूर्ती वर्षांत म्हणजे 2042 पर्यंतचा दृष्टिकोन आराखडा तयार करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी तंत्रज्ञान विकसित करावे आणि त्याचा दर्जा तसेच मापदंड सर्वोच्च ठेवण्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा
उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन संस्थांनी निर्वेधपणे आणि अधिक सामंजस्याने काम करावे तसेच, भारताच्या ऊर्जाविषयक गरजा आणि चक्राकार अर्थव्यवस्थेवर भर द्यावा-पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधानांनी वैज्ञानिक समुदायाला ‘एक व्यक्ती- एक प्रयोगशाळा’ असा दृष्टिकोन वापरण्याचा दिला सल्ला
तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देत, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, वाणिज्यिक आणि सामाजिक घटकांविषयी एकात्मिक दृष्टिकोन बाळगण्यावर भर
Posted On:
15 OCT 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआयआरचे पदसिद्ध अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सीएसआयआर सोसायटीची आज त्यांच्या निवासस्थानी लोककल्याण मार्गावर बैठक झाली.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह ही सीएसआयआरचे उपाध्यक्ष असून त्यांच्यासह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल या बैठकीला उपस्थित होते. तसेच, सीएसआयआर सोसायटीचे सदस्य- ज्यात नामवंत वैज्ञानिक, उद्योजक आणि वैज्ञानिक आणि इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या 80 वर्षांत, सीएसआयआर ने केलेल्या कार्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच, 2042 साली जेव्हा ह्या संस्थेची शतकपूर्ती होईल, तेव्हासाठीचा दृष्टिकोन आराखडा तयार करावा,असे आवाहन त्यांनी केले. संस्थेने त्यांच्या गेल्या 80 वर्षातील प्रवास आणि कार्याचे दस्तऐवजीकरण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे, आतापर्यंत सीएसआयआरने केलेल्या प्रगतीचा आढावा घेता येईल, आणि जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करता येतील, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यावर भर देत, ते म्हणाले की वैज्ञानिक, वाणिज्यिक आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवायला हवा. वैज्ञानिक समुदायाच्या सर्व नेत्यांनी एक व्यक्ती-एक प्रयोगशाळा दृष्टिकोन स्वीकारावा, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे, देशांत वैज्ञानिक संशोधन आणि विकासाचा दृष्टिकोन निर्माण होईल, असेही ते म्हणाले. सर्व प्रयोगशाळांची एक आभासी परिषद नियमितपणे घेतली जावी, ज्यातून एकमेकांच्या अनुभवातून नवे काहीतरी शिकता येईल. असेही त्यांनी सुचवले.

तृणधान्ये आणि बाजरीच्या नवीन वाणांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि उत्पादन आणि पौष्टिक घटकांमध्ये सुधारणा करण्यासाठी तांत्रिक उपाय शोधण्याचे आवाहन पंतप्रधानांनी वैज्ञानिक समुदायाला केले.शास्त्रज्ञांनी स्वदेशी खाद्यपदार्थांच्या उच्च पौष्टिक मूल्यांचा कॅटलॉग म्हणजे माहिती पुस्तिका विकसित करावी अशी सूचनाही त्यांनी केली, जेणेकरून, जगभरातही खाद्यपदार्थ अधिकाधिक स्वीकारले जातील. उद्योगक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन संस्थांनी अधिक एकात्मतेने अविरत काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारताच्या उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत शाश्वत विकासासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी तंत्रज्ञान विकसित करावं आणि हरित ऊर्जेवर लक्ष केंद्रित करून उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अभिनव दृष्टिकोनाचा अवलंब करावा असं आवाहन, पंतप्रधानांनी केलं. पारंपरिक ज्ञानापासून ते विद्यार्थ्यांना त्यांची आवड, कौशल्य आणि क्षमता जोपासता येतील अशा विविध क्षेत्रात, कृत्रिम बुद्धीमत्तेसारखा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारताला जागतिक नेता बनवण्याच्या उद्देशानं व्हिजन 2047 च्या दिशेनं वाटचाल करत असताना, भविष्यातील भारत आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवता येईल, असं पंतप्रधान म्हणाले

तत्पूर्वी, कार्यक्रमात सुरुवातीला केलेल्या भाषणात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, या वर्षी देश स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण करत असतानाच, सीएसआयआरनं 80 वर्षे पूर्ण केली आहेत, म्हणजे दोघांनीही जवळपास एकत्र प्रवास केला आहे. उद्योग, शिक्षण आणि संशोधन, यांचा एकत्रित विचार करुन त्यांच्यात परस्पर समन्वय आणि संपर्क राखला जावा, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
सीएसआयआर च्या महासंचालक डॉ एन कलैसेल्वी यांनी, CSIR ला अलिकडच्या काळात मिळालेलं यश आणि योगदान यावर एक सादरीकरण केलं आणि काश्मीरमध्ये जांभळ्या क्रांतीची सुरुवात करणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बससाठी अलिकडे झालेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. भारताच्या समृद्ध पारंपारिक ज्ञानावर आधारित नवोन्मेषी कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी उघडलेल्या TKDL वाचनालयाचाही त्यांनी उल्लेख केला. MRNA प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाद्वारे भविष्यातील संभाव्य महामारीचा मुकाबला करण्यासाठीची सुसज्जता, तरुण वैज्ञानिक घडवण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचं संवर्धन आणि शाश्वत स्टार्ट-अप, तसच जिग्यासा व्हर्च्युअल लॅबद्वारे शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, या CSIR च्या काही महत्त्वाच्या उपक्रमांचाही महासंचालकांनी उल्लेख केला. राष्ट्रीय महत्वाकांक्षा आणि vision@2047 शी संलग्न असलेल्या CSIR व्हिजन 2030 चा कृती आराखडा देखील, त्यांनी यावेळी सादर केला.
* * *
S.Patil/R.Aghor/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1868153)
Visitor Counter : 211