सहकार मंत्रालय
सिक्कीममधील गंगटोक येथे पूर्व आणि ईशान्य सहकारी डेअरी परिषद 2022चे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
महिला सक्षमीकरण, दारिद्र्य निर्मूलन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डेअरी उद्योग असून डेअरी सोबतच हजारो कोट्यवधी मुलांच्या पोषणाची व्यवस्था उभी राहते
अमित शहा यांच्या हस्ते गंगटोक येथे राजभवनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण
Posted On:
07 OCT 2022 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पूर्व आणि ईशान्य सहकारी डेअरी परिषद 2022 चे उद्घाटन केले.दुसऱ्या एका कार्यक्रमात, अमित शहा यांनी गंगटोक येथील राजभवन मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
15 वर्षांपूर्वी हिमालयीन राज्यामध्ये, देशभरातील सहकारी डेअरी परिषद आयोजित केली जाऊ शकते याची कोणीही कल्पना केली नसेल, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी पूर्व आणि ईशान्य क्षेत्र डेअरी सहकारी परिषदेला संबोधित करताना सांगितले. महिला सक्षमीकरण, दारिद्र्य निर्मूलन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दुग्ध उत्पादन हा एकमेव मार्ग आहे आणि सिक्कीममधील छोट्या शेतकरी बांधवांकडून दररोज दोन लाख लिटर दुधाचे उत्पादन पाहून मनःशांती मिळते आणि आनंदाची आनंदाची अनुभूती येते, असे त्यांनी सांगितले. सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने (एनडीडीबी ) प्रत्येक पंचायतीमध्ये बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांची (पीएसीएस) योजना आखली आहे, या योजनेच्या माध्यमातून डेअरी, एफपीओ, कृषी आणि गॅस उत्पादनाच्या वितरणाचे काम केले जाईल असे शाह यांनी सांगितले. एलपीजी वितरणाची व्यवस्था करण्याबरोबरच ही योजना पेट्रोल पंप आणि आवश्यक तिथे साठवणूक आणि विपणनाची व्यवस्था करेल. सिक्कीमसारख्या डोंगराळ राज्यातील गावांना गावातील पीसीओद्वारे संपूर्ण जगाशी जोडण्यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्था देखील काम करतील , सहकार मंत्रालयाने अशा बहुउद्देशीय आणि बहुआयामी प्राथमिक कृषी पतसंस्थांची योजना आखली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार चळवळीची 70 वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवे असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते म्ह्णाले की, सहकारी संस्थांमध्ये मोठी क्षमता आहे आणि सहकार क्षेत्र हा गुजरात राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहे. केवळ गुजरात राज्य विचारात घेतले तर येथील 36 लाख महिला अमूल संघटनेच्या माध्यमातून वर्षाला 56,000 कोटी रुपये कमावतात अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, ईशान्येकडील स्वित्झर्लंड अशी ख्याती असलेले आपले सिक्कीम राज्य फक्त येथील सौंदर्यामुळे प्रसिध्द होऊ नये, तर येथील प्रत्येक गाव भरभराटीला आणून समृद्ध तसेच विकसित राज्य म्हणून सिक्कीमची प्रगती होणे आवश्यक आहे.
येत्या 5 वर्षांत देशातील प्रत्येक पंचायतीत प्राथमिक कृषी कर्ज संस्था आणि डेरी यांची स्थापना करण्यात आली पाहिजे असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री शाह यांनी दिली. ते म्हणाले की, या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा देशाच्या पूर्वेकडील तसेच ईशान्य भागातील प्रदेशांना होईल कारण, या भागांमध्ये नोंदल्या गेलेल्या प्राथमिक कृषी कर्ज संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे. ईशान्येकडील भागात, प्रत्येक पंचायतीमध्ये डेरीचा समावेश असलेली किमान एक बहु-उद्देशीय प्राथमिक कृषी कर्ज संस्था सुरु झाली की देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागाच्या भरभराटीला कोणीही थोपवू शकणार नाही.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ईशान्य भारताचा खऱ्या अर्थाने विकास होऊ लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समग्र दृष्टीकोनासह ईशान्य प्रदेशाचे विकासकार्य सुरु केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी संपूर्ण ईशान्य भागाच्या विकासासाठी केलेल्या खर्चाशी तुलना करता गेल्या 10 वर्षात या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेला खर्च अधिक असेल असे केंद्रीय सहकार मंत्री शाह यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भागातील प्रत्येक राज्यात विमानतळ, रेल्वे मार्ग, नवे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, सिंचन व्यवस्था तसेच नव्या उद्योगांची उभारणी झाली आहे. मोदी ईशान्य भागाला अष्टलक्ष्मी असे संबोधतात असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, आपण यापुढे अशा प्रकारे प्रगती केली पाहिजे की जेणेकरून ही आठ राज्ये आठ विविध प्रकारचे भांडवल निर्माण करण्यास सक्षम होतील.
* * *
S.Patil/S.Chavan/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865950)
Visitor Counter : 219