वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतातील लेखा परीक्षण संस्थांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी सनदी लेखापालांनी विशेष प्रयत्न करावेत - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं आवाहन


सनदी लेखापालांनी कायम समान आणि एकात्मिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असावे: पीयूष गोयल

अधिकाधिक महिलांनी सनदी लेखापरीक्षण व्यवसायात येण्याचे गोयल यांचे आवाहन

Posted On: 06 OCT 2022 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

देशातील लेखापरीक्षण संस्था जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी, सनदी लेखापालांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

सनदी लेखापरीक्षण व्यवसाय हा जगातील सर्वात उत्तम व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे, असे सांगत, कोणत्याही कागदपत्रांवर, एखाद्या सनदी लेखापालाची स्वाक्षरी असणे, म्हणजे ती कागदपत्रे आणि त्यावरील मजकूराच्या सत्यतेचे, विश्वासार्हतेचे आणि खरेपणाचे ते प्रमाण असते, असे गोयल म्हणाले. आयसीएआयच्या 168 पेक्षा अधिक शाखा आहेत, 47 देशांमध्ये, जगातील विविध शहरांमध्ये 77 केंद्रे आहेत, त्यामुळे या संस्थेने जागतिक मंचावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जगभरात 100 पेक्षा जास्त केंद्रे स्थापन करण्याच्या आयसीएआयच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच, या संस्थेने, दक्षिण अमेरिका खंडातही आपले अस्तित्व निर्माण करावे, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001E4W6.jpg

देशाच्या एकात्मिक आणि एकसमान विकासासाठी, सनदी लेखापालांनी कटिबद्ध असण्याची गरज आहे, यावर भर देत, केंद्रीय मंत्री म्हणाले की भारत विकसित देश म्हणून घडत असताना ह्या विकासप्रवाहात कोणीही मागे राहून जाणार नाही, अशी प्रगती आपल्याला करायची आहे. आपण समाजातील सर्व घटकांना आपल्यासोबत घेऊन जायला हवे. समाजाच्या तथाकथित उतरंडीत सर्वात खालच्या पायरीवर असलेला घटक, उपेक्षित, वंचित वर्ग अशा सर्वांना आपण सोबत घेतले पाहिजे. देशातील सर्वात उपेक्षित नागरिकाला देखील उत्तम दर्जाचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच सनदी लेखापालांनी सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देत, त्या व्यक्तींच्या अशा अधिकारांचे संरक्षण करायला हवे, असेही गोयल म्हणाले.

युवा सनदी लेखापालांनी, लेखापरीक्षण, हिशेब, व्यवस्थापन सल्लागार अशा व्यवसायांसोबतच स्वयंउद्यमशीलतेचा मार्गही अनुसरावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच देशातील सनदी लेखापरीक्षण संस्थांनी आपल्या संस्थांमध्ये, अधिकाधिक ‘स्त्रीशक्ति’ला सहभागी करुन घ्यावे, अधिकाधिक महिला सनदी लेखापाल बनतील तसेच, आयसीएआयच्या परिषदेत सहभागी होऊन, ही संस्था अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक करतील, यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, पंतप्रधानांनी जे ‘पंच-प्रण’ सांगितले आहेत, त्यांचा उल्लेख गोयल यांनी केला. ही पाच तत्वे, पाच निश्चय आपल्याला पुढच्या 25 वर्षांची वाटचाल करायला प्रेरणा देतील. तसेच या पाच प्रतिज्ञा, सनदी लेखापालांसाठी देखील अतिशय महत्वाच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पहिल्या संकल्पाविषयी बोलतांना ते म्हणाले, की भारतातील ग्रामीण आणि शहरी जीवनामध्ये निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विकसनशील देश आणि विकसित देश, गरीब आणि श्रीमंत, गुंतवणूकदार आणि स्वयंउद्योजक या सगळ्यांमधील दरी मिटवून 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले.

भारताचा समृद्ध इतिहास, परंपरा, वारसा, संस्कृती आणि वसुधैव कुटुंबकम वृत्ती जोपासणारी आपली आदर्श प्राचीन मूल्ये, याविषयी तरुणांनी अभिमान बाळगायला हवा, असेही ते म्हणाले.

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865632) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu