अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 11.65 कोटी रुपयांचे 23.23 किलो सोने ईशान्य सीमेवरून केले जप्त, 4 जणांना अटक


ईशान्य कॉरिडॉरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर 2022 मध्ये 11 प्रकरणात 121 किलो सोने केले जप्त

Posted On: 05 OCT 2022 3:55PM by PIB Mumbai

 

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून सोन्याच्या तस्करीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील सीमांचा वापर तस्करीसाठी केला जात होता. सप्टेंबर 2022 या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 11 कारवायांमध्ये एकूण 121 किलो सोने जप्त करण्यात आले. यावरुन हे दिसून येते की ईशान्य कॉरिडॉर मार्गाचा वापर तस्करांकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

विशिष्ट गुप्त कारवाई अंतर्गत पाटणा, दिल्ली आणि मुंबई येथील तीनही केंद्रांच्या समन्वयाने, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 33.40 कोटी रुपयांचे विदेशात निर्मित 65.46 किलो सोने जप्त केले. हे सोने आयझॉल येथून देशांतर्गत कुरिअर मार्फत मुंबईत पाठवण्यात आले होते. कपड्यांच्या म्हणून जाहीर केलेल्या गोण्यांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते.

त्याच मार्गाने तस्करीच्या आणखी एका प्रकरणात, विदेशात उत्पादन केलेल्या सोन्याचा तस्करी करून आणलेला एक मोठा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला. या साठ्याचे वजन अंदाजे 23.23 किलो आहे तर त्याची किंमत 11.65 कोटी रुपये (अंदाजे) असून या साठ्याची म्यानमारमधून तस्करी केली जात होती. विदेशात निर्मित हा सोन्याचा साठा चंफई- आयझॉल, मिझोराम येथून कोलकाता, पश्चिम बंगाल येथे वाहनात नेऊन/ लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पुरावे विशिष्ट गुप्तचरांनी सादर केले होते. ही तस्करी रोखण्यासाठी 28 - 29 सप्टेंबर 2022 रोजी समन्वित कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सिलीगुडी आणि गुवाहाटीला जोडणाऱ्या महामार्गावर पाळत ठेवली. 2 संशयित वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात आले. 2 दिवसांच्या कालावधीत दोन्ही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर, वाहनाच्या विविध भागात 21 दंडगोलाकार तुकड्यांमध्ये लपवून ठेवलेले 23.23 किलो सोने जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात सोने दोन्ही वाहनांच्या मागच्या चाकांच्या मागे असलेल्या चेसीच्या उजव्या आणि डाव्या रेल्सला जोडणाऱ्या क्रॉस-मेम्बर मेटल पाईपच्या आत खास बनवलेल्या पोकळीत आणि सस्पेंशनमधे बसवण्यासाठी सोन्याचा विशिष्ट आकार देण्यात आला होता. जप्त केलेले सोने म्यानमारमधून मिझोराममधील झोखावथार सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865344) Visitor Counter : 251